समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव हे जूनमध्ये पार पडलेल्या रामपूर आणि आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गैरहजर राहिले होते. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला पार पडलेल्या गोला गोकर्णनाथ विधानसभा पोटनिवडणुकीतही अखिलेश यादव यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे तिन्ही जागांवर समाजवादी पक्षाचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे रामपूर आणि आझमगड हे दोन्ही मतदारसंघ समाजवादी पार्टीचे बालेकिल्ले मानले जातात. असं असलं याठिकाणी भाजपाने समाजवादी पक्षाला पराभूत केलं आहे.
यानंतर आता अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव मैनपुरी लोकसभा पोटनिवडणूक लढवत आहेत. अखिलेश यादव यांचे वडील आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे मैनपुरीत पोटनिवडणूक पार पडत आहे. त्यामुळे अखिलेश यादव पुन्हा प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या १० दिवसांपासून ते मैनपुरीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या वडिलांनी मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून सुमारे पाच वेळा विजय संपादन केला. त्यामुळे या जागेवर पुन्हा आपल्याच कुटुंबाची सत्ता टिकून ठेवण्यासाठी अखिलेश यादव जोरदार प्रयत्न करत आहेत.
“अखिलेश यादव यांनी आझमगड आणि रामपूरमध्ये प्रचार न केल्यामुळे आम्ही लोकसभेच्या दोन्ही जागा थोड्या फरकाने गमावल्या. स्थानिक पक्ष युनिटने त्यांना आश्वासन दिले होतं की, त्यांना त्याठिकाणी येऊन प्रचार करण्याची काहीही गरज नाही. संबंधित जागा सहजपणे जागा जिंकता येतील. आझम खान यांच्या निकटवर्तीयाला रामपूर येथून उमेदवारी दिल्यामुळे आझम खान यांनीच या जागेची जबाबदारी घेतली होती. पण दोन्ही जागेवर समाजवादी पक्षाचा पराभव झाला. अखिलेश यादव यांनी प्रचार केला असता तर पक्षाला ती जागा जिंकता आली असती” असं मत समाजवादी पार्टीच्या नेत्यानं व्यक्त केलं.
“डिंपल यादव यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच एक आठवडाआधीच अखिलेश यादव मैनपुरी येथे पोहोचले. तेव्हापासून, ते केवळ एका दिवसासाठी लखनऊला गेले. त्यानंतर प्रचाराचे नेतृत्व करण्यासाठी ते मैनपुरी येथे तळ ठोकून आहेत” अशी माहिती पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिली. “विशेष म्हणजे अखिलेश यादव यांनी या निवडणुकीची जबाबदारी सपा प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम यांच्याकडे दिली आहे, परंतु ते स्वतः कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच नियमितपणे प्रचाराचा आढावा घेण्याचं काम करत आहेत” अशी माहिती एका स्थानिक सपा नेत्याने दिली.
दुसरीकडे, डिंपल यादव यांनीही किशानी येथे प्रचारसभेला संबोधित केलं असून समाजवादी पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांची भेट घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागाचे दौरे करणे आणि छोट्या-छोट्या गटात गावकऱ्यांशी संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे.