पुणे : ‘पक्षातील गटबाजी बाजूला ठेवा आणि महापालिका निवडणुकांसाठी संघर्ष करण्यास तयार रहा.’ असा आदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देऊन तीन दिवस उलटत नाहीत, तोच प्रदेशाध्यक्षांचा आदेश धुडकावून शहराध्यक्ष पदावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये गटबाजी आणि पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

तीन वर्षांपासून असलेले प्रभारी शहराध्यक्षपद आता पूर्णवेळ नेमण्यासाठी काँग्रसमधील एक गट कार्यरत झाला असल्याने आगामी काळात काँग्रेसमध्ये संघर्ष पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ यांनी पुण्यात काँग्रेस भवनमध्ये येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचा सल्ला दिला. गटबाजी बाजूला ठेऊन पुण्यातील प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करा, अशा सूचनाही दिल्या. मात्र, सपकाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता पक्षातील गटबाजी आता शहराध्यक्ष पदावरून उफाळून आली आहे.

प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा एक गट असून, माजी आमदार रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांचा एक गट सक्रिय आहे. शिंदे यांना पूर्ण वेळ शहराध्यक्ष पद देण्यास या गटाचा विरोध असल्याने माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यममार्ग म्हणून शिंदे यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष पदाची धुरा कायम ठेवली होती. मात्र, आता प्रदेश पातळीवर खांदेपालट झाल्यानंतर सपकाळ यांनी पुणे शहरातील कार्यकारिणीत बदल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शहर काँग्रेसमधील दोन्ही गटांनी हे पद मिळविण्यासाठी राज्यपातळीवर संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गटबाजी थोपविण्याऐवजी शहराध्यक्ष पदावरून पुन्हा गटबाजीला वेग आला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिंदे यांच्याकडे १० जून २०२२ रोजी शहराध्यक्ष पदाचा प्रभारी कारभार सोपविण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा विजय हे एकमेव यश काँग्रेसला मिळाले. लोकसभा निवडणुकीतही धंगेकर यांनी चांगलीच लढत दिली होती. मात्र, हा काँग्रेसचा नसून धंगेकर यांचा वैयक्तिक करिष्मा असल्याचे दिसून आले होते.धंगेकर यांनी आता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती विधानसभा मतदार संघातील बंडखोरीही रोखण्यात आली नाही. हे मुद्दे पुढे करून आता शहराध्यक्ष बदलासाठी विरोधी गटाने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांच्या कार्यकाळात पक्षाला अपयश आल्याची बाब विरोधी गटाकडून नेत्यांच्या लक्षात आणून देण्यात येत आहे. दुसरीकडे प्रभारी पदाऐवजी पूर्णवेळ शहराध्यक्ष म्हणून नेमणूक होण्यासाठी शिंदे गटाकडून भेटीगाठी सुरू झाल्याने शहर काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष पदावरून गटबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आजवरचे पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष

पुणे महापालिकेची १९५० मध्ये स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत २६ शहराध्यक्ष झाले आहेत. १९५० मध्ये नानासाहेब गुप्ते हे पहिले शहराध्यक्ष झाले. त्यानंतर १९५२ मध्ये कन्हैयालाला तिवारी हे शहराध्यक्ष होते. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस हे १९५३ ते ५५ या कालावधीत शहराध्यक्ष होते. माजी महापौर नामदेवराव मते हे १९५५ ते १९५९ या काळात शहराध्यक्ष होते. त्यानंतर बाबुराव सणस यांच्याकडे पुन्हा या पदाची धुरा सोपविण्यात आली. १९५९ ते १९६१ या काळात ते शहराध्यक्ष होते. त्यानंतर नामदेवराव मते यांच्याकडे १९६१ ते १९६४ या कालावधीत पुन्हा हे पद आले. १९६४ ते १९६७ या काळात रंगराव पाटील हे शहराध्यक्ष होते. त्यानंतर नामदेव रूकारी आणि बबनराव पडवळ हे काही काळासाठी हंगामी शहराध्यक्ष होते. त्यानंतर १९६८ मध्ये तिसऱ्यांदा नामदेवराव मते यांच्याकडे हे पद देण्यात आले.

सुरुवातीला शिवाजीराव ढमढेरे यांच्याकडे हंगामी शहराध्यक्ष पद होते. मात्र, १९७१ मध्ये त्यांची या पदावर वर्णी लागली. ढमढेरे यांच्यानंतर माजी आमदार वसंतराव थोरात यांच्याकडे हे पद आले. त्यांनी आजारपणामुळे राजीनामा दिल्यावर बबनराव पडवळ यांच्याकडे दुसऱ्यांना हंगामी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. १९७७ मध्ये माजी आमदार शामकांत मोरे, १९७८ ते १९८२ या काळात माजी आमदार अमिनुद्दीन पेनवाले हे शहराध्यक्ष होते.

शहर काँग्रेसच्या पहिल्या महिला शहराध्यक्ष म्हणून १९८२ ते १९८५ या काळात शालिनी राणे यांच्याकडे या पदाची धुरा देण्यात आली. त्यांच्यानंतर माजी आमदार प्रकाश ढेरे हे १९८५ ते १९९२ या काळात शहराध्यक्ष होते. माजी महापौर विठ्ठलराव लडकत यांच्याकडे १९९२ ते १९९५ या काळासाठी हे पद देण्यात आले. य. ग. शिंदे हे एक दिवसासाठी शहराध्यक्ष होते. त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी १९९७ पर्यंत शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९९७ ते २००४ या काळात मोहन जोशी यांनी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.

माजी नगरसेविका संगिता देवकर यांच्याकडे दोन महिने हे पद होते. त्यानंतर २० एप्रिल २००४ ते १२ एप्रिल २०१६ या प्रदीर्घ काळात अभय छाजेड हे शहराध्यक्ष होते. त्यांच्यानंतर १८ एप्रिल २०१६ ते ७ जून २०२२ या काळात माजी मंत्री रमेश बागवे यांनी या पदाची धुरा सांभाळली. १० जून २०२२ पासून अरविंद शिंदे यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष पद देण्यात आले आहे.