अनिकेत साठे
नाशिक : महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमीचे औचित्य साधत नव्याने मतांची बेगमी करण्याची धडपड केली आहे. शहरातील बहुतांश प्रभागात इच्छुकांनी आयोजिलेल्या विविधांगी कार्यक्रमांनी रंगोत्सवात वेगळेच रंग भरले गेले. त्यामुळे पारंपरिक पेशवेकालीन रहाडींच्या जोडीला अनेक प्रभागात संगीताच्या तालावर वर्षा नृत्यात (रेन डान्स) चिंब होण्याची संधी मतदारांना मिळाली. काही प्रभागात खास महिलांसाठी रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
महानगरपालिकेची मुदत संपुष्टात येऊन जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला आहे. प्रभाग रचना व आरक्षणाच्या घोळात निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर भाजपचा आक्षेप आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा नव्याने होण्याची शक्यता आहे. २०१७ प्रमाणे पूूर्वीचीच प्रभाग रचना कायम राहण्याचा काहींचा अंदाज आहे. वर्षभरापासून निवडणुकीची अनेक माजी नगरसेवक व अन्य इच्छुक प्रतीक्षा करीत आहेत. दिवाळीपासून त्यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. एरवी महानगरपालिका निवडणूक वर्षात सणोत्सव दणक्यात साजरे होतात. प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत मागे न राहण्याची खबरदारी सारे राजकीय पक्ष व इच्छुक घेत असतात. त्याचे प्रत्यंतर रविवारच्या रंगोत्सवात देखील आले.
हेही वाचा >>> जळगावात महाविकास आघाडीला तडे; जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीत खडसेंना धक्का
आता निर्बंध नसल्याने आणि महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने नेहमीपेक्षा अधिक उत्साह संचारला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अनेक प्रभागात इच्छुक व राजकीय नेत्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे खास महिलांसाठी वासननगर येथील मैदानावर रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत ठाकरे गटही मागे राहिला नाही. या पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या शिवसेवा मंडळाने मेनरोडवर भव्य स्वरुपात वर्षानृत्याचे आयोजन केले. यापासून हाकेच्या अंतरावर काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र बागूल यांच्या प्रेरणा मित्र मंडळाने तर जुने नाशिक भागात याच पक्षाचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी देखील तशाच उपक्रमाचे आयोजन केले. नाशिकरोडमध्येही काही प्रभागात अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा >>> रामदास कदमांचे बंधू पण ठाकरे गटाचे समर्थक, ईडीने अटक केलेले सदानंद कदम कोण आहेत?
शहरातील पारंपरिक रहाडी सामाजिक मंडळांच्या अखत्यारीतील आहेत. त्या शेजारी काही इच्छुकांनी वर्षा नृत्याची व्यवस्था केली. विविध प्रभागात इच्छुक व प्रमुख राजकीय नेत्यांशी संबंधित मंडळांनी वर्षा नृत्य वा रंगपंचमीनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले. या ठिकाणी संगीताच्या तालावर अविरत पाण्याचा वर्षाव सुरु राहिला. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात रंगोत्सव रंगला. यात हजारोंच्या संख्येने युवा वर्गाचा सहभाग राहिला. या माध्यमातून आगामी निवडणुकीत मतांची पेरणी करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागल्याचे दिसून आले.