दिगंबर शिंदे

राज्यात शिवसेनेअंतर्गत सुरू असलेला टोकाचा संघर्ष अपघातग्रस्त वारकऱ्यांची चौकशी आणि मदतकार्यातही दिसून आला. कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे चार दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झालेल्या वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस करीत प्रत्येक जखमीला २५ हजारांची तातडीची मदत जाहीर केली. हे समजताच ही मदत प्रत्यक्ष पोहोचण्यापूर्वीच पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावतीने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी पाच हजाराची रोखीने मदत रुग्णालयात पोचती केली. सध्या शिवसेनेतील सत्तास्पर्धेचे हल्ले-प्रतिहल्ले रोज गाजत असताना आता ही लढाई अगदी जखमींच्या मदतकार्यांपर्यंत पोहोचल्याने तिने किती टोक गाठले आहे, याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

पंढरपुरात विठ्ठल महापूजेला जोडूनच शिंदे गटाचा मेळावा

कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे ५ जुलै रोजी पंढरीच्या वाटेवर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत एक वाहन घुसून अपघात झाला. यामध्ये १८ वारकरी जखमी झाले. यापैकी १४ वारकऱ्यांना उपचारासाठी मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधून वारकऱ्यांवर योग्य व तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रसंगी खासगी रुग्णालयात उपचार करावेत असेही आदेश देत येईल तो खर्च देण्याची तयारी दर्शवली.

यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाचे खंदे समर्थक आमदार अनिल बाबर यांनी जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरजेचे रुग्णालय गाठले. यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या जखमी वारकऱ्यांचा थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद घडवून आणला. या वेळी शिंदे यांनी त्यांना दिलासा देत राज्य शासनाच्यावतीने प्रत्येकी २५ हजारांची तातडीची मदतही जाहीर केली.

मंत्रिपदासाठी आता पायी दिंडी आणि महाआरत्याही, मराठवाड्यात शक्तीप्रदर्शनानंतर नवा कल

एकीकडे शिंदे गटाकडून वारकऱ्यांसाठी एवढे सगळे सुरू केल्यानंतर त्याची वार्ता सांगली परिसर किंवा शिवसेनेपुरती न राहता थेट वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचली. हे लक्षात येताच मातोश्रीवरूनही तातडीने हालचाली झाल्या. विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांच्याकडून आलेल्या निरोपानुसार स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकारी बजरंग पाटील, सुनिता मोरे, चंद्रकांत मैगुरे, तानाजी सातपुते आदींनी रुग्णालय गाठून जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. तसेच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डॉ. गोऱ्हे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत विचारपूस करून दिलासा दिला. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रेरणेतून प्रत्येक जखमी वारकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदतही रुग्णालयात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यामार्फत दिली गेली. राज्यात सध्या शिवसेनेअंतर्गत सत्तास्पर्धेची तीव्र लढाई सुरू आहे. आरोप-प्रत्योरापांची राळ गल्लीपासून राज्य पातळीपर्यंत उडाली आहे. आता ही लढाई अगदी जखमींच्या मदतकार्यांपर्यंत पोहोचल्याने तिने किती टोक गाठले आहे, याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

Story img Loader