सांगली/ कराड : महाविकास आघाडीची सत्ता आल्यास जयंत पाटील यांच्याकडे ‘मोठी जबाबदारी’ सोपवण्याच्या शरद पवार यांच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच गुरुवारी कराड येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ‘मविआच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतचा विषय संपुष्टात येईल’ असे विधान केले. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता इस्लामपूरमध्ये झाली. त्या सभेत जयंत पाटील हे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. तोच धागा पकडून शरद पवार यांनी ‘‘पुन्हा एकदा सत्ता मिळाल्यास महाराष्ट्राची जबाबदारी इस्लामपूरच्या नेतृत्वाकडे सोपवणार’ असे विधान केले. तसेच याबाबत पक्ष आग्रही असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची उलटसुलट चर्चा सुरू असताना कराड येथे पवारांनी वेगळाच सूर आळवला. इस्लामपूरमधील वक्तव्याबाबत विचारले असता ‘आघाडीतील मुख्य घटक पक्षांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा विषय संपुष्टात येईल’ असे पवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदावर आपला दावा आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, की आधी निवडणुकीचा निकाल तर लागू द्या. मग त्या संदर्भात बोलू.

हेही वाचा >>>कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आपल्या पक्षाकडून जयंत पाटील चर्चा करत असून आतापर्यंत २०० जागांवर एकमत झाले असल्याचेही पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांनी ‘लाडकी बहीण योजने’वर टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, की सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानेच त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ आणली आहे. अशा योजनांमुळे तिजोरी रिकामी करत मते मिळवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे.

शिराळा, वाळवा तालुक्यासह या भागातील स्वातंत्र्यसैनिकांनी देशाची पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र घडविण्यासाठी यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, वसंतदादा पाटील आदींनी प्रयत्न केले. आता याच परंपरेत उद्या राज्यात सत्ता आल्यानंतर जयंत पाटील हेच राज्याचे नेतृत्व करणार आहेत.– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)