सुहास सरदेशमुख
४४८ कोटी रुपयांचे कर्ज असणाऱ्या बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांनी निवड झाली आणि उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे समर्थक चंद्रकांत कराड यांची यांची वर्णी लागली. मुंडे बहिण भावाच्या ‘सहकार’ धोरणामुळे दोन गटात कमालीचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र कोंडी झाली आहे. सहकाराचे हे तत्व नक्की कोणत्या कारणासाठी याचे अजूनही परळी परिसरात कोडेच आहे. बहिण भावाचा हा सहकार साखर कारखाना सुरू करण्यासाठी आहे काय, असा सवालही आता केला जात आहे. गेल्या दोन हंगामातील ५ कोटी १९ लाख रुपयांची देणी अद्यापही बाकी आहेत.
परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांची पकड आहे. परळी बाहेरच्या मतदारसंघात मात्र पंकजा मुंडे यांचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय कोंडीतून बाहेर पडायचे असेल तर ‘सहकार’ जपला पाहिजे असे सूत्र मुंडे बहिण- भावाने ठरविले. त्यातून वैद्यनाथ सहकार साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचे ११ तर धनंजय मुंडे गटाचे दहा संचालक निवडले गेले. या नव्या सहकार मंत्रामुळे साखर कारखान्याचे हित झाले तर त्याचे स्वागतच करायचे हवे असे शेतकरी संघटनेचे कालीदास आपेट यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे राजकीय अर्थाने राज्यस्तरावर एकट्या पडाव्यात असे प्रयत्न भाजच्या राज्यस्तरीय नेतृत्वाकडून वारंवार केले जात आहेत. त्यातून आपल्याला आमदार का केले जात नाही, असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटी दरम्यान आपण विचारु, असे पंकजा मुंडे अलिकडेच जाहीर भाषणा दरम्यान म्हणाल्या होत्या.
हेही वाचा >>> जमाखर्च : दादा भुसे; ना खात्याचा प्रभाव, मतदारसंघातच व्यस्त
आता बहिण – भावाच्या सहकारामुळे शेतकऱ्यांचा लाभ होईल का, असाही प्रश्न आता विचारला जात आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकार साखर कारखान्यामध्ये सहवीज निर्मिती प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्पही आहे. या परिसरात ऊस लागवडही चांगली आहे. मात्र, हा कारखाना सुरू करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षातील ऊस देयकाची रक्कम देऊन कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी उपलब्ध होणार का असा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. राज्य सरकारकडून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत झालेली नाही. साखर कारखान्यातील ‘सहकार प्रयोग’ कारखाना सुरू झाला तर मतदारसंघावर प्रभाव निर्माण करणारा ठरणारा असू शकतो. मात्र, साखर कारखान्यांवर असणाऱ्या कर्जाचा डोंगर लक्षात घेता हा कारखाना सुरू होईल का, या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. सहकार धोरणामुळे धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे या लढ्यात ग्रामपंचायतीपासून एकमेकांना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली असल्याची भावना परळी मतदारसंघात आहे.