वसंत मुंडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड : शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नगरपालिका अंतर्गत विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केले. परिणामी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना संपर्कप्रमुखांनी क्षीरसागरांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचा पूर्वीच प्रवेश झाला असल्याने उमेदवारीचा शब्द मिळत नाही. तर इच्छा असूनही भाजपात प्रवेश होत नाही. दुसरीकडे स्थानिक पातळीवर भाजप क्षीरसागरांना प्रखर विरोध करण्याची संधी सोडत नाही. अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाल्याने एके काळी एकहाती सत्ता आणि नेतृत्व करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर या वेळी मात्र कोणता झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रातील वेगळेपण काय?, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी सांगितले रहस्य

बीड जिल्ह्याच्या राजकारणात चाळीस वर्षांपासून क्षीरसागर घराणे प्रमुख राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घरी जाऊन क्षीरसागरांचा प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत जयदत्त क्षीरसागर यांचा शब्द अंतिम असे. जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून क्षीरसागरांचा संपर्क असल्याने पक्ष नेतृत्व इच्छा असतानाही त्यांना टाळण्याची हिंमत करत नसे. अंतर्गत गटबाजीत क्षीरसागरांचाच वर्चस्व राहिले आहे. चार वेळा आमदार, मंत्री, पालकमंत्री अशी एकहाती सत्ता त्यांच्याकडे राहिली. मात्र चार वर्षांपूर्वी गृहकलहानंतर राष्ट्रवादीतून पुतणे संदीप क्षीरसागर यांना राजकीय बळ मिळू लागल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेत प्रवेश करून मंत्री पद मिळवले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाटेला असलेल्या एकमेव बीड मतदार संघातून उमेदवारी मिळाली मात्र पुतणे राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांना राजकीय ताकद दिल्यामुळे क्षीरसागरांसमोर स्थानिक पातळीवर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयुष्यभर शिवसेनेला विरोध केल्यानंतर राजकीय अपरिहर्तेमुळे शिवसेनेचाच सहारा घ्यावा लागला. तरी स्थानिक पातळीवरील क्षीरसागरांची स्वतंत्र काम करण्याच्या भूमिकेमुळे शिवसेना नेत्यांशी फारसे सूर जुळले नाहीत. दरम्यान, शिवसेनेत फाटाफूट झाल्यानंतर क्षीरसागरांनी कोणतीच उघड भूमिका न घेता ‘पाहा आणि वाट बघा’ची भूमिका घेतली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी प्रवेश करून बीड विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचा शब्द घेतल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा… श्रद्धा ठाकूर : कुशल संघटक

एकनाथ शिंदेंशी थेट संबंध असतानाही क्षीरसागरांना उमेदवारीचा शब्द मिळत नाही. दरम्यान, नगरपालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षीरसागर बंधूंनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांनी पत्रकार बैठक घेऊन क्षीरसागरांचा पक्षाशी संबंध नसल्याचे जाहीर करून टाकले. ठाकरे गटाकडून संबंध तुटला आणि शिंदे गटाकडून शब्द मिळत नसल्याने क्षीरसागरांसमोर आता राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तयारी क्षीरसागरांनी सुरू केली आहे. दोन्ही शिवसेना गटापासून दूर गेल्यामुळे क्षीरसागरांचा थेट भाजपात प्रवेश होईल असे मानले जात होते. क्षीरसागरांचेही तसे प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक पातळीवरील भाजप मात्र क्षीरसागरांना विरोध करण्याची एकही संधी सोडत नाही. जलजीवन मिशनच्या दीडशे कामांना मंजुरी मिळाल्याची बातमी क्षीरसागरांंनी प्रसारित करताच भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सत्ता भाजपची असताना क्षीरसागरांचा संबंध येतो कोठे, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे स्थानिक पातळीवरील भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आणि कार्यकर्ते क्षीरसागरांच्या प्रवेशाला प्रखर विरोध करत असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असलेले जयदत्त क्षीरसागर यांची मात्र पुरती कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीत पुतणे आमदार, काँग्रेसमध्येही भविष्य दिसत नाही. दोन्ही शिवसेनेपासून दूर आणि भाजपमध्ये प्रवेश मिळत नाही अशा परिस्थितीत क्षीरसागरांपुढे कोणता झेंडा घ्यावा हाती, अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political dilemma before former minister jaydutt kshirsagar print politics news asj