अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारससंघातील निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपचे वर्चस्व वाढत असताना काँग्रेसच्या वर्चस्वाचा बुरूज ढासळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही या बदललेल्या समीकरणांचा मोठा परिणाम होणार आहे. नवे चेहरेही राजकारणात आल्याने कार्यपद्धतीत बदल होण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यात महायुतीचे सात तर महाविकास आघाडीचा एक आमदार निवडून आला आहे. यापुर्वी काँग्रेसचे तीन, भाजपचा एक, प्रहारचे दोन, युवा स्वाभिमान पक्षाचा एक आमदार होता. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. तर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. आगामी काळात या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. तर भाजपच्या पाठिंब्यावर बडनेरामधून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) सुलभा खोडके या अमरावतीतून निवडून आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीसह विषय समित्यांमध्ये महायुतीचे वजन वाढणार आहे. पर्यायाने विकासकामे, निधी खर्चाच्या बाबतीतही महायुतीच्या आमदारांचा शब्द अधिक वजनदार ठरू शकतो. महाविकास आघाडीच्या एकमेव आमदारला यासाठी संघर्ष करावा लागेल. केंद्रात आणि राज्यातही भाजपचे युतीचे सरकार असल्याने त्याचा लाभ सत्ताधारी आमदारांना अधिक प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्येही स्थानिक आमदारांचा प्रभाव दिसून येणार आहे. पण, आमदारकी गेली, तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व राहावे, म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील राहतील. दुसऱ्या बाजूला विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांवरही ताबा घेण्याचा ताकदीचा प्रयत्न महायुतीच्या आमदारांकडून तसेच नेत्यांकडून केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राजकारणावरील वर्चस्वाची स्पर्धा दिसून सेते. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
आणखी वाचा-वर्चस्वाच्या लढाईत प्रफुल पटेल यांची नाना पटोलेंवर मात
महापालिका, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ साधारणपणे अडीच वर्षांपुर्वी मध्ये संपला. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेव्हापासून प्रशासक कारभार पाहत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार, की स्वतंत्र याबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत. या निवडणुका स्वबळावर लढविल्या गेल्यास प्रत्येकाची ताकद समजून येईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
नेत्यांमधील संघर्ष वाढणार
माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. कडूंच्या पराभवामुळे तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या भूमिकेकडेही अनेकांचे लक्ष राहणार आहे. महायुतीतील अंतर्गत संघर्षाचा परिणामही दिसून येणार आहे.