सांगली : महाविकास आघाडीच्या जोरावर राज्यातील सत्ता हाती येणार अशी स्वप्ने पाहत असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत महायुतीने घरचा रस्ता दाखवला तरी काँग्रेस आत्मपरिक्षण करायला राजी नाही. महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लगेचच नसल्या तरी महायुतीतील भाजपने या निवडणुकीची तयारी सुरू केली असताना सांगलीत मात्र काँग्रेसमध्ये बेरजेऐवजी वजाबाकीचेच राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना एकाकी पाडून काँग्रेस पुन्हा आपल्याच ताब्यात घेण्याचे प्रयत्न एकीकडे वसंतदादा गटाकडून सुरू असताना पाटील सुद्धा अन्य पर्यायाच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एकेकाळी कृष्णाकाठी बहरलेली काँग्रेस कोमेजत चालली आहे. याची ना नेत्यांना चिंता ना कार्यकर्त्यांना सोयरसुतक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभेसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील हे होते. मात्र ऐन उमेदवारीच्या गदारोळात जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांच्या भावजय तथा काँग्रेसचे माजी मंत्री स्व. मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे भाजपचे सुधीर गाडगीळ यांना तिसर्‍यांदा आमदार पदाची संधी लाभली असे दिसत असले तरी दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज वेगळच सांगते. मात्र, काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या गटबाजीचा फायदा भाजपने उचलला ही वस्तुस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले विशाल पाटील यांना भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्या पेक्षा २० हजार मते अधिक मिळाली होती. सांगलीत काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचे दिसत असताना श्रीमती पाटील यांची बंडखोरी भाजपला लाभदायी ठरली. ही बंडखोरी भाजप पुरस्कृत असल्याचा आरोपही अधिकृत उमेदवारांनी केला. यामुळे श्रीमती पाटील यांची काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई झाली. तथापि, त्यांच्या समवेत असलेल्या माजी नगरसेवकांवरही कारवाई करण्यात आलेली मागणी मात्र दुर्लक्षित करण्यात आली.

एकीकडे कारवाईचा हा गोंधळ सुरू असतानच माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी कडेगावमध्ये बोलावलेल्या बैठकीस खा. पाटील हे आवर्जुन उपस्थित होते. काँग्रेसचे सहयोगी सदस्य असल्याने त्यांच्या उपस्थितीला फारसा आक्षेप असण्याचे कारण नसले तरी श्रीमती पाटील याही या बैठकीस उपस्थित होत्या. बंडखोरीला सहायभूत ठरणारी अनेक काँग्रेस कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष पाटील यांची अनुपस्थिती होती. प्रदेश समितीच्या बैठकीत बंडखोरांना पुन्हा काँग्रेसमध्ये पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप करत पाटील यांनी आपला आक्षेप नोंदवला. याच्या बातम्याही आवर्जुन प्रसिध्द करवून घेण्याचे आणि विरोधकांना जागा दाखवून देण्याचे काम हेतूपुरस्सर करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून माजी महापौर किशोर शहा यांनीही पृथ्वीराज पाटील हेच भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप करत एका भाजप आमदारांना प्रिती भोजन कोणाच्या बंगल्यावर देण्यात आले असा सवाल करत श्री. पाटील यांच्या भवितव्याबाबत प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले. आता हा राजकीय संघर्ष पक्ष निष्ठ आणि पक्ष विरोधी असा असला तरी काँग्रेसअंतर्गतच मामला आहे. सत्ता नसताना चाललेली टीका टिपणी काँग्रेसच्या भवितव्याला फारशी अनुकूल दिसत नाही. श्री. पाटील यांना काँग्रेसमध्ये एकाकी पाडण्याचा प्रयत्न जिल्हा पातळीवर सुरू असून याला ते कसे तोंड देतात की पर्यायी मार्गाचा अवलंब करतात हे येणारा काळच सांगणार आहे.