नागपूर : सत्तेत आल्यापासून राजकारणात सर्वंच अंगाने शक्तिशाली झालेल्या भारतीय जनता पक्षाला आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेली टीकाही नकोशी झालेली आहे, राजकारणात टिकेला प्रत्युत्तर टिकेने देणे अपेक्षित असते, आजवर हे होतही आले. पण अलीकडे टिकेचा स्थर व्यक्तिगत पातळीपर्यंत घसरू लागला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नव्यानेच आमदार झालेले भाजप नेते संदीप जोशी यांच्यातील कलगीतुरा याचे उत्तम उदाहारण मानावे लागेल.
विशेष म्हणजे वरील दोन नेत्यांमध्ये रंगलेला कलगीतुरा हा विकासाच्या मुद्यावर , सर्वसामान्यांच्या प्रश्नावर नाही, तो असता तर ते समजण्यासारखे होते. पण हे मुद्दे आहेत नागपूर बाहेरचे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून वडेट्टीवार यांना राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करावे लागते. चर्चेत राहण्यासाठी असे करणे हा आत्ताच्या राजकारणातील एक अपरिहार्य भाग आहे. विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवक्ते आहेत. पण येथे भाजप आमदार संदीप जोशी यांनी यात उडी घेतली. तसा जोशींचा स्वभाव नाही पण, वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये विधान केल्याने त्यांना तेथूनच प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न झाला.
मुद्दे काय होते ?
वडेट्टीवार-जोशी यांच्यातील वादाचा पहिला मुद्दा ठरला तो गुडी पाडव्याला गुडी उभारण्याबाबत वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाचा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्त्येचा उल्लेख करीत वडेट्टीवार यांनी ‘मी नाही उभारत गुढी’ असे विधान केले होते. वास्तविक ते त्यांचे व्यक्तिगत मत होते.पण संदीप जोशी यांनी त्याला प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार यांच्या कुटुंबियाच्या व्यवसायावर टिप्पणी केली.ती टाळायला हवी होती. त्यामुळे स्वाभाविकच वडेट्टीवार यांच्यातील मुळचा ‘शिवसैनिक’ जागा झाला व त्यांनीही प्रत्युत्तर देताना जोशींवर व्यक्तिगत पातळीवरची टीका केली. जशाच तसे उत्तर देण्याचा प्रकार झाल्यावर तो तेथेच थांबायला हवा होता. पण तसे झाले नाही. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या घटनेवरून पुन्हा वरील प्रकाराची उजळणी झाली.
दिनानाथच्या मुद्यावरून वडेट्टीवार मंगेशकर कटुंबावर घसरले. त्यांच्यावर विखारी आरोप केले. वास्तविक याचा प्रतिवाद ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी करणे अपेक्षित होते. पण पुन्हा एकदा संदीप जोशी यांनी यात उडी घेतली व स्थानिक कलावंताना पुढे करीत वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. यावर वडेट्टीवार यांच्याकडून उत्तर येणे बाकी आहे. पण या दोन नेत्यांमधील वाद आता आणखी पेटणार हे निश्चत.
नागपूर ही जोशींची राजकीय कर्मभूमीच आहे. वडेट्टीवार यांचा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यांचे निवासस्थान नागपुरात आहे. ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा भाजप नेत्यांकडूनच केली जाते. या पार्श्वभूमीवर वरील दोन नेत्यांमधील वाद महत्वाचा ठरतो.