मोहन अटाळकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिक्षक किंवा पदवीधरांच्या मतदार संघांमध्ये राजकीय घुसखोरीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असताना पुढल्या वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेतही हालचाली गतिमान झाल्या आहेत.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपणार आहे. भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने देखील उमेदवार निवडीची तयारी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. उमेदवाराच्या नावावर अजून शिक्कामोर्तब झाले नसले, तरी संभाव्य उमेदवाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, शिवसेनेतर्फे बुलढाण्याचे माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. या मतदार संघात तयारी करण्याविषयीचे पत्र शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुखांना वर्षभरापूर्वी दिले होते. या पत्रात निवडणुकीची पूर्वतयारी, मतदार नोंदणी आणि बैठका यांची जबाबदारी धीरज लिंगाडे यांच्याकडे दिली होतीं लेकिन, त्यामुळे लिंगाडे हे सेनेचे उमेदवार असतील, असे संकेत शिवसेनेने दिले होते.
हेही वाचा… दक्षिण सोलापुरात आमदारकीसाठी दिलीप मानेंची भूमिका ‘एकला चलो रे..’
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तयारीविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बुलढाण्याच्या खासदारांसह आमदार शिंदे गटात सामील झाले. लिंगाडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने पदवीधर मतदार संघात ते शिवसेनेतर्फे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.
हेही वाचा… दापोलीत शिंदे गटाच्या मेळाव्यात भाजप पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर स्थान
काँग्रेसतर्फे अनेक जण इच्छूक आहेत, त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी तयारी केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढली होती. यात पाच मतदार संघांचा समावेश होता. त्यापैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या, तर अमरावती शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवार निवडून आले होते. भाजपला या निवडणुकीत हादरा बसला होता. मात्र, आता शिवसेना आणि काँग्रेसने यावेळी पदवीधर मतदार संघात स्वतंत्र भूमिका घेतली, तर महाविकास आघाडीत मतभेद अटळ असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा… सभासद नोंदणीवरून राष्ट्रवादीच्या निरीक्षकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या
सलग तीन दशके ‘नुटा’ आणि पर्यायाने बी.टी.देशमुख यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या मतदार संघात भाजपने सर्वप्रथम २०१० च्या निवडणुकीत शिक्षक, पदवीधर संघटनांना हादरा दिला. या मतदार संघात थेट राजकीय पक्षप्रवेशाची ती नांदी ठरली. या निवडणुकीनंतर तर विविध व्यावसायिक संघटनांचा प्रभाव क्षीण झाल्याचे चित्र दिसून आले. त्यावेळी थेट लढतीत बी.टी. देशमुख यांना पराभूत करून भाजपचे डॉ.रणजीत पाटील हे निवडून आले होते. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी डॉ. रणजीत पाटील हे गृहराज्यमंत्री होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खोडके यांनी एकाकी लढत दिली. पण, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे. मोठा विस्तार असलेल्या मतदार संघात राजकीय पक्षांसाठी, इच्छूक उमेदवारांसाठी मतदार नोंदणी हे एक दिव्य असते. सोबतच शिक्षक, पदवीधरांच्या संघटनांचे सहकार्य देखील आवश्यक असते.
काँग्रेसने २०१० पर्यंत या मतदारसंघात ‘नुटा’ला समर्थन दिले होते. गेल्या वेळी वेळी ‘नुटा’चा उमेदवार नव्हता, पण या संघटनेने कुणालाही पाठिंबा देण्याचे टाळले होते. सदस्यांना स्वविवेकाने मतदान करण्यास सांगण्यात आले होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासह अनेक संघटनांसोबत असूनही त्याचा लाभ संजय खोडके यांना मिळू शकला नव्हता. मराशिप, शिक्षक आघाडीच्या साथीने भाजपने ही निवडणूक जिंकली, पण या निवडणुकीवर व्यावसायिक संघटनांऐवजी पक्षसंघटनेचाच वरचष्मा दिसून आला होता.
विधानसभेत निवडून आलेले सदस्य हे प्रादेशिक प्रतिनिधित्व करतात. मतदारसंघातल्या समस्या सदनात मांडण्याचे काम करणे अपेक्षित असते पण, त्यापुढे जाऊन विविध गटांचे प्रतिनिधित्व असावे म्हणून विधान परिषदेसाठी पदवीधर, शिक्षक असे मतदारसंघ निघाले. अनेक लेखक आणि विचारवंतांना पदवीधर मतदार संघांमधून निवडून येण्याची संधी मिळाली. पण, ही परंपरा हळूहळू थांबली आणि या मतदार संघांवरही राजकीय प्रभाव दिसू लागला. आता या मतदार संघात कशा प्रकारची लढत होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
‘नुटा’ची भूमिका बैठकीत ठरणार
गेल्या निवडणुकीत ‘नुटा’चा उमेदवार लढतीत नव्हता. आगामी निवडणुकीत उमेदवारीविषयी संघटनेच्या पुढल्या महिन्यात होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ‘नुटा’ने पदवीधर मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. संघटनेची भूमिका बैठकीतील चर्चेअंती ठरणार आहे. – डॉ.प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष, ‘नुटा’.