Haryana BJP Controversy : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा गुलाल फिका पडताच हरियाणात भाजपामध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री अनिल विज यांना सोमवारी (११ फेब्रुवारी) ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर पक्षशिस्त मोडणे आणि विचारसणीविरुद्ध काम करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या नोटिशीला पुढील तीन दिवसांत त्यांनी उत्तर द्यावं, असं भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं आहे. हिमाचल सामूहिक बलात्कार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर विज यांनी मोहनलाल बडोली यांचा राजीनामा मागितला होता. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनाही त्यांनी लक्ष्य केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोटिशीत नेमकं काय म्हटलं आहे?

दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली म्हणाले, “हो… पक्षाने कॅबिनेट मंत्री अनिल विज यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. मला त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.” नोटिशीत विज यांच्याकडे कसली उत्तरं मागितली याची माहिती बडोली यांनी दिलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, अनिल विज यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये असं म्हटलं आहे, “तुम्ही (अनिल विज) अलीकडेच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांविरुद्ध सार्वजनिक विधानं केली आहेत. ही कृती अत्यंत गंभीर असून, ती पक्षाचं धोरण आणि शिस्त यांच्या विरुद्ध आहे.”

आणखी वाचा : Delhi Election Result 2025 : दिल्लीत दलित मतदारांनी भाजपाला का नाकारलं? यामागचं कारण काय?

“तुम्ही (अनिल विज) केलेली विधानं केवळ पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधातच नाहीत, तर ती पक्षाची प्रतिमा मलीन करणारीही आहेत. तुम्हाला माहीत होतं की, आपल्याकडे मंत्रिपद असूनही निवडणुकीदरम्यान केलेली अशी विधानं पक्षाची प्रतिमा खराब करू शकतील. असं कृत्य पूर्णपणे अस्वीकार्य आहे”, असंही भाजपानं ‘कारणे दाखवा’ नोटिशीत म्हटलं आहे. भाजपच्या सूत्रांनी सांगितलं की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही विज यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची माहिती देण्यात आली होती, त्यानंतर त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली.

मंत्री अनिल विज नेमकं काय म्हणाले होते?

गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये हरियाणात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपानं हॅटट्रिक केली आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. मात्र, सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या अंबाला कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काही अदृश्य शक्तींनी त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी सात हजार २०० मताधिक्यानं निवडणूक जिंकून सातव्यांदा विधानसभेत प्रवेश केला. अनिल विज हे भाजपाचे ज्येष्ठ नेते असून, सध्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा, वाहतूक व कामगार विभागाचे मंत्री आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर मंत्री विज नाराज?

नायब सिंह सैनी यांनी सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मंत्री विज हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरून आपल्याच सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याचबरोबर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून, काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेशही त्यांनी दिले आहेत. गेल्या महिन्यात विज यांनी माध्यमांबरोबर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. “आपले मुख्यमंत्री (नायब सिंह सैनी) कधीही त्यांच्या उडत्या रथातून खाली उतरत नाहीत. ज्या दिवसापासून ते मुख्यमंत्री झाले आहेत, त्या दिवसापासून त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांच्या व्यथा ऐकून घ्यायला हव्यात. हा फक्त माझा आवाज नाही, तर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा आवाज आहे”, असं मंत्री विज म्हणाले होते.

अनिल विज यांनी रद्द केला जनता दरबार

दरम्यान, जेव्हा मंत्री अनिल विज हे हरियाणा सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उभी करत होते, तेव्हा सैनी हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारात व्यग्र होते. “हरियाणा निवडणुकीदरम्यान, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं माझा पराभव करण्यासाठी चांगलीच ‘फिल्डिंग’ लावली होती. निवडणुकीच्या निकालानंतर एका आठवड्यातच मी हा मुद्दा उपस्थित केला होता. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही,” असा आरोपही मंत्री विज यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकारी आदेशाचे पालन करीत नसल्याने विज यांनी त्यांचा जनता दरबारही रद्द केला आहे. गरज पडल्यास शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांच्यासारखे आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा : Who is Parvesh Varma : अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे ‘जायंट किलर’ पर्वेश वर्मा कोण आहेत?

भाजपा प्रदेशाध्यक्षांवर बलात्काराचा गुन्हा

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका तरुणीनं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली आणि गायक रॉकी मित्तल यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. दोघांनीही हिमाचल प्रदेशमधील एका हॉटेलमध्ये माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असं तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी बडोली आणि मित्तल यांच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यावेळी मंत्री विज यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. “मोहनलाल बडोली यांच्यावरील आरोप गंभीर असल्यानं त्यांनी तातडीनं प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”, असं मंत्री विज म्हणाले होते.

हरियाणात भाजपा आमदारांमध्ये अस्वस्थता?

“पक्षाचं केंद्रीय नेतृत्व त्यांच्याविरुद्ध (बडोली) योग्य ती कारवाई करेल”, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. या प्रकरणात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात बोलणारे ते भाजपाचे एकमेव नेते होते. ४ फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजपाचे हरियाणा प्रभारी सतीश पूनिया यांनी चंदिगडमध्ये मंत्री अनिल विज यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा रंगली. बैठकीनंतर माध्यमांबरोबर चर्चा करताना मंत्री विज म्हणाले, “मी पूनिया यांच्याकडे माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आता प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. याबाबत मी पूनिया यांना आणखी काही सांगू शकत नाही. लवकरच सर्व काही ठीक होईल.” हरियाणात पक्षांतर्गत वाद उफाळून आल्यानं भाजपाचे आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय नेतृत्वानं याकडे तातडीनं लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political news haryana bjp controversy minister anil vij faces notice against criticism on cm saini and state chief sdp