तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केल्याने प्रस्थापितांना त्याची काळजी वाटू लागली आहे. पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षांमधील नेत्यांना सामावून घेणे असा मोठा कार्यक्रमच राव यांनी हाती घेतला असून, त्यांचे महाराष्ट्रातील दौरेही वाढू लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत राष्ट्र समितीच्या नागपूरमधील कार्यालयाचे उद्‌घाटन चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर नंतर नागपूरमध्ये पक्ष वाढीवर भर देण्यात आला आहे. ठिकठिकाणी पक्ष कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. काही कोटी रुपये खर्च करून भारत राष्ट्र समितीच्या वतीने पक्ष कार्यालयांसाठी जागा खरेदी करण्यात येत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमधील काही मंडळींनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. भारत राष्ट्र समितीच्या विस्ताराची प्रारंभी फारशी चर्चा नव्हती. पण अन्य पक्षांमधील नेत्यांचा प्रवेश व पक्ष कार्यालये उघडण्यात येत असल्याने भारत राष्ट्र समितीचे अस्तित्व जाणवू लागले आहे. सांगली, सोलापूर, चंद्रपूरसह विविध भागांमध्ये चंद्रशेखर राव यांची मोठी पोस्टर्स लागलेली दिसू लागली आहेत.

हेही वाचा – जमाखर्च : उदय सामंत, उद्योगमंत्री; खरोखरीच ‘उद्योगस्नेही’ होणार का?

राज्याच्या राजकारणाचे कंगोरे ज्ञात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रशेखर राव यांच्या पक्ष विस्ताराबद्दल चिंता व्यक्त केली. यावरून चंद्रशेखर राव यांचे आव्हान असल्याचे स्पष्टच दिसते. भाजपची ब टिम अशी संभावना करीत पवार यांनी, सत्ताधारी भाजपकडून कदाचित चंद्रशेखर राव यांचा उपयोग केला जात असावा, अशी शंका व्यक्त केली.

भारत राष्ट्र समितीच्या कार्याची इतर पक्षांना दखल घ्यावीच लागणार आहे. कारण आमच्या पक्षाला शेतकरी, मजूर, दुर्बल घटक यांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव सरकारने राबविलेल्या रायतू बंधू, दलित बंधू अशा विविध योजनांमधून समाजातील सर्व घटकांचा फायदा झाला आहे. हे काम समोर असल्याने राज्यातही चांगला पाठिंबा मिळत असल्याचे भारत राष्ट्र समितीचे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी सांगितले. राज्यात पक्षाचा आणखी विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – मुस्लीम धर्म त्यागून हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या अली अकबर यांची भाजपाला सोडचिठ्ठी; म्हणाले, “आता धर्मासाठी…”

तेलंगणात भारत राष्ट्र समिती आणि भाजपमध्ये अजिबात सख्य नाही. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता या सध्या दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. त्यांची चौकशी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद भेटीच्या वेळी विमानतळावर स्वागताला जाण्याचे चंद्रशेखर राव यांनी वर्षभर टाळले आहे. तसेच भात खरेदीवरून चंद्रशेखर राव आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये वाद झाला होता. मुलगी कविता यांना वाचविण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी भाजपशी पडद्याआडून हातमिळवणी केली का, अशी शंका राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political parties are worried about k chandrashekhar rao party expansion in the state of maharashtra print politics news ssb
Show comments