वसई- निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ बघायला मिळते. पण मीरा भाईंदर शहरात देखील मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय चढाओढ लागली आहे. मात्र ही चढाओढ कुठल्या श्रेयवादाची नाही तर भव्यदिव्य धार्मिक कार्यक्रम करण्याची आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराला धार्मिक रंग चढला असून राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी धार्मिक प्रवचन, सत्संगाचे कार्यक्रम करण्यात येत आहे. गीता जैन, प्रताप सरनाईक यांनी भव्य धार्मिक उत्सवांचे आयोजन केले. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून माजी आमदार यांनी देखील सत्संगाच्या कार्यक्रम जाहीर केला. या धार्मिक सोहळ्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.

राजकाऱणात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक मुद्ये प्रभावी ठरत असतात. त्यामुळे राजकारणी धार्मिक मुद्द्यांचा आधार घेत लोकांना भावनिक साद घालून आपल्या बाजून वळवण्याचा प्रयत्न करत असतात. मीरा भाईंदर शहरात सध्या हे धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न दिसून येत आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदार गीता जैन यांना स्वत:ची प्रतिमा ‘हिंदू शेरनी’ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी बागेश्वर धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम आयोजित करून शक्तीप्रदर्शन केले होते. या कार्यक्रमासाठी कोटयवधी रुपयांची उधळण करण्यात आली होती. त्यामुळे यंदा निवडणुकीच्या तोंडावर गीत जैन यांनी पुन्हा मिरा रोड येथील सेंटर पार्क मैदानात रामभद्राचार्य महाराज यांच्या श्री राम कथेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १८ ते २४ सप्टेंबर या काळात जैन यांनी धार्मिक कार्यक्रम घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या रामकथेच्या माध्यमातून बड्या राजकीय पुढार्‍यांना व कलाकारांना बोलावून शक्ती प्रदर्शन आणि वातावरण निर्मिती करण्यात आली.

हेही वाचा >>>नगरमध्ये महाविकास आघाडीत तीन जागांचा तिढा

प्रताप सरनाईक यांचा सत्संग

गीता जैन यांच्या धार्मिक कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि जमलेला प्रचंड समुदाय पाहून शिवसेना (शिंदे) आमदार प्रताप सरनाईक यांना देखील धार्मिक कार्यक्रमाचा मोह आवरला नाही. सरनाईक यांनी देखील भाईंदर मध्ये ३ दिवसांचा ‘भागवत सत्संग- सनातन राष्ट्रीय महासत्सं’ आयोजित करून जैन यांच्यावर मात केली. या महासत्संगची जोरदार प्रसिध्दी केली. सर्व प्रमुख वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जाहिराती छापून आणल्या. या महासत्संगात आयोध्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, अयोध्या सदन पिठाधीश्वर रामानुचार्य स्वामी वासुदेव विद्यासागर महाराज, द्वारकाधीश सदानंद सरस्वती महाराज आणि शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना शहरात आणले. . या कार्यक्रमांच्या सांगता समारोपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपस्थित राहिले. शिंदे यांनी साधू-संतांकडून स्वत:चे कौतुकही करवून घेतले. नेमका त्याच दिवशी मंत्रिमंडळाने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला होता. त्याचे श्रेय त्यांनी घेतले. यावेळी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना ते गो-मातेचा पुत्र म्हणून ओळखले जाणार असल्याचे सागून शिंदे यांना ‘सनातन धर्म रक्षक तथा हिंदू रक्षक ‘ अशी उपाधी देऊन टाकली. गाईला राज्यमातेचा दर्जा दिल्याचे श्रेय घेण्याची पुरेपुर खबरदारी या महासत्संगातून सरनाईक आणि मुख्यमंत्र्यांनी घेतली.

हेही वाचा >>>निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांना शिवप्रेमाचे भरते ;छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा सपाटा

आमदार नरेंद्र मेहता देखील धार्मिक ध्रुवीकरणात

गीता जैन आणि प्रताप सरनाईक यांच्या धार्मिक कार्यक्रमाला मिळालेला लोकांचा झालेली गर्दी पाहून माजी आमदार नरेंद्र मेहता हे देखील कसे मागे राहतील ? सरनाईक यांनी देखील या दोघांवर मात करण्यासाठी धार्मिक कार्यक्रम जाहीर केला आहे. नवरात्रोत्सवानंतर १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम अधिक मोठा व्हावा यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या धार्मिक कार्यक्रमामुळे कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. राजकीय गदारोळात मतदारांचे धार्मिक धुर्वीकरण करण्याचा हा प्रयत्न शहरात चांगलाच रंगला आहे.