प्रताप सिम्हा भाजपाचे खासदार होण्याआधी उजव्या विचारसरणीच्या एक लोकप्रिय वृत्तपत्रातील स्तंभलेखक म्हणून ओळखले जात होते. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादावर लिहिताना अल्पसंख्याकविरोधी मांडणी केली. त्यांनी २०१२ मधील कथित दहशतवादी कटावरून त्यांच्या लेखांमध्ये अल्पसंख्याक समाजावर सडकून टीका केली. प्रताप सिम्हा हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते असून “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकनिष्ठ आहे”, असं ते जाहीरपणे सांगतात. ४७ वर्षीय प्रताप सिम्हा भाजपाचे म्हैसूरमधील दोन पंचवार्षिक निवडून आलेले खासदार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रताप सिम्हा यांचा स्तंभलेखक ते खासदार प्रवास कसा झाला, त्यांचे स्वपक्षातील आमदारांशी वाद, संसदेतील घुसखोरीची घटना आणि आगामी लोकसभा निवडणूक याचा हा आढावा…
सध्या विरोधकांकडून खासदार सिम्हा यांच्यावर सडकून टीका होत आहे. याचं कारण ठरलं १३ डिसेंबरला संसदेची सुरक्षा भेदून प्रेक्षक गॅलरीतून थेट लाईव्ह सुरू असलेल्या सभागृहात उडी घेणाऱ्या तरुणांकडे सापडलेले प्रताप सिम्हा यांच्या स्वाक्षरीचे पास. घुसखोरी करणाऱ्या तरुणांना भाजपा खासदार सिम्हा यांनी पास दिल्याचं समोर आल्यानंतर या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.
प्रताप सिम्हा यांचा स्तंभलेखक ते भाजपा खासदार कसा झाला?
सिम्हा हे ‘कन्नड प्रभा’ वृत्तपत्राचे माजी स्तंभलेखक आहेत. २००८ मध्ये त्यांनी तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर ‘द अनट्रोडन पाथ’ हे कन्नड भाषेत पुस्तक लिहिलं. त्यामुळेच त्यांना २०१४ मध्ये लोकसभेचे तिकीट मिळाल्याचं मानलं जातं.
२०१४ मध्ये मोदी लाटेवर स्वार होऊन ३३ दिवसांमध्ये खासदार
प्रताप सिम्हा २०१४ मध्ये मोदी लाटेवर स्वार होऊन ३३ दिवसांमध्ये खासदार झाले होते. याच सिम्हा यांचा आता त्यांच्याच म्हैसूर मतदारसंघातील ३३ वर्षीय मनोरंजन देवराज याने संसदेचे पास घेऊन विश्वासघात केल्याचा दावा केला जात आहे. देवराजने संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून संसदेच्या खालच्या सभागृहात उडी मारली आणि सरकारचा निषेध करत धुराची नळकांडी फोडली. वोक्कलिगा समाजातील देवराजने लोकसभेच्या पाससाठी सातत्याने लॉबिंग केल्याचाही दावा केला जात आहे.
राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणातील उदय
प्रताप सिम्हा यांना कोणतीही मजबूत राजकीय पार्श्वभूमी नव्हती. केवळ अत्यंत लोकप्रिय वृत्तपत्रातील स्तंभलेखक अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांचा राजकारणातील उदय आश्चर्यकारक होता. २०१९ मध्ये सिम्हा यांनी दुसऱ्यांचा लोकसभा निवडणूक लढली. त्यावेळी त्यांनी त्या विजयाचे श्रेय मोदी लाटेला दिलं होतं.
“मोदी माझ्यासाठीही आशेचं प्रतिक आहे”
भाजपाने २०१४ मध्ये त्यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रताप सिम्हा म्हणाले होते, “इतर अनेक लोकांप्रमाणेच मोदी माझ्यासाठीही आशेचं प्रतिक आहे. मोदींकडे आपल्या देशाच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहेत. त्या कल्पनांमधील दृष्टीकोन वरवरचा नाही. पक्षाने मला नरेंद्र मोदींबरोबर काम करण्यास सक्षम मानले आहे आणि मला निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. याचा मला खरोखरच अभिमान वाटतो.”
प्रताप सिम्हा यांच्या हत्येचा कथित कट
सिम्हा यांनी २००८ च्या त्यांच्या पुस्तकातून मोठ्या प्रमाणात कन्नड वाचकांना मोदींची ओळख करून दिली. त्यानंतर २०१२ मध्ये सिम्हा यांच्या हत्येसाठी कथितपणे दहशतवादी कट रचल्याचा आरोप झाला. या प्रकरणी २९ ऑगस्ट २०१२ रोजी बंगळुरू पोलिसांनी हुबळीतून दोन युवकांना अटक केली. त्यांच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्यावर कर्नाटकमधील उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.
प्रताप सिम्हा आणि वाद
सिम्हा त्यांच्या कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे अनेकदा वादात सापडले. २०१७ मध्ये हुन्सूरमधील अल्पसंख्याक समुदाय राहत असलेल्या भागातून हनुमान जयंतीची मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र, पहिल्यांदाच खासदार झाल्यानंतर सिम्हा यांनी प्रतिबंधात्मक आदेश असूनही पोलिसांचे बॅरिकेड तोडत या भागातून गाडी चालवली. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाचं मुल्यांकन आंदोलनातील अश्रूधुराच्या नळकांड्या आणि लाठीमाराच्या आधारे करतील, असं सांगितल्याचंही बोललं गेलं. २०१९ मध्ये कर्नाटकात भाजपा सत्तेवर आल्यावर सिम्हा यांच्यावरील पोलीस खटले मागे घेण्यात आले.
सिम्हा यांचे भाजपाच्या स्थानिक आमदारांशी वाद
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सिम्हा यांनी माध्यमांनी कथित लज्जास्पद संभाषण ऑडिओ क्लिपवर वार्तांकन करू नये यासाठी बंगळुरू न्यायालयात धाव घेतली. तसेच वार्तांकनावर रोख लावणारे आदेश मिळवले. त्यांच्या खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये सिम्हांचे म्हैसूरमधील काही भाजपा आमदारांशी टोकाचे मतभेद झाले होते. एकदा तर त्यांनी म्हैसूरमधील अधिकाऱ्यांवर ‘गुंबाज’सारखी रचना असलेले बसस्थानक बांधल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे त्यांचा तत्कालीन स्थानिक भाजपा आमदार एस. ए. रामदास यांच्याशी वाद झाला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार कोण?
एका सार्वजनिक कार्यक्रमात सिम्हांची माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. यानंतर बोम्मई यांनी त्यांना ‘ओव्हरस्मार्ट’ म्हटलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर सिम्हा यांनी पराभवाला बी. एस. येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांना जबाबदार धरले. हे दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखालील सरकार विरोधी पक्षातील नेत्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कारवाई करण्यास इच्छूक नसल्याचा आरोप सिम्हा यांनी केला होता.
प्रताप सिम्हा यांच्यावर विरोधकांची सडकून टीका
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सुरक्षेचं उल्लंघन प्रकरणी झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करत भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाईची मागणी केली. महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेच्या पोर्टलवरील खात्याचा पासवर्ड इतरांशी शेअर केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांची लोकसभेच्या खासदार पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. हाच मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना पास देणाऱ्या भाजपा खासदारावर कारवाईचा मुद्दा जोरकसपणे मांडला आहे.
संसदेतील घुसखोर प्रताप सिम्हा यांचे निकटवर्तीय?
संसदेतील प्रकारानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेसने देवराज भाजप खासदार सिम्हा यांच्यासाठी भाजपाच्या आयटी विभागात काम करत होता, असा आरोप केला आहे. १४ डिसेंबरला काँग्रेसचे प्रवक्ते एम. लक्ष्मण यांनी आरोप केला की, देवराज सिम्हा यांच्या जवळचा व्यक्ती होता. त्या दोघांची दिल्लीसह अनेक ठिकाणी भेट झाली होती. दुसरीकडे म्हैसूर पोलिसांनी देवराजने सिम्हा यांच्यासाठी कोणतेही काम केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असा दावा केला. मनोरंजनचे वडील देवराजे गौडांनीही त्यांच्या कुटुंबाचा खासदार सिम्हा यांच्याशी केवळ मतदारसंघातील मतदार म्हणून संबंध असल्याचं म्हटलं.
हेही वाचा : कर्नाटक : अधिवेशनात भाजपातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न!
प्रताप सिम्हा यांचं राजकीय भविष्य काय?
आधीच स्थानिक आमदारांशी खराब झालेले संबंध आणि आता संसदेतील घुसखोरी प्रकरण यानंतर प्रताप सिम्हा यांना आगामी लोकसभा निवडणुकीत तिसर्यांदा निवडून येण्यासाठी मोदींच्या लोकप्रियतेवरच अवलंबून रहावं लागणार आहे.