संजीव कुळकर्णी
नांदेड : काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव खतगावकर किंवा भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर व शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यातील कौटुंबिक नातेसंबंधांचा उल्लेख ‘दाजी-भावजी’ असा केला जातो. यांतील पहिल्या दोघांच्या राजकीय नात्याची वीण गेल्या दोन वर्षांत घट्ट झालेली असताना दुसर्या जोडीच्या नात्यांतील वीण उसवत चालल्याचे दिसत होतेच; हे उसवलेले संबंध आता फाटले असून दंड-मांडी थोपटून एक दुसर्याला राजकीयदृष्ट्या संपविण्याच्या भाषेपर्यंत गेले आहेत.
नांदेड जिल्ह्यात सहा बाजार समित्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यांत मुखेड वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपचा अक्षरशः धुव्वा उडाला. उमरी, बिलोली आणि कुंडलवाडीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसमोर भाजपचा निभाव लागणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले होते, पण लोहा बाजार समितीत खासदार चिखलीकरांच्या नेतृत्वाखालील गटाचा दारुण पराभव केल्यानंतर आमदार शिंदे यांनी विजयी मिरवणुकीत आपल्या मेव्हण्याविरुद्ध जाहीरपणे मांडी-दंड थोपटत पुढच्या राजकारणात त्यांना उघड आव्हान दिल्याची बाब राजकीय वर्तुळात चांगलीच गाजली.
आणखी वाचा-पालघरमधील ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गज नेत्यांची कसोटी
भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसची घराणेशाही तसेच चव्हाण-खतगावकरांच्या वर्चस्वावर नेहमीच निशाणा साधला. आता महाजन, मुंडे यांच्या पश्चात भाजपत वरचढ होऊ पाहणार्या चिखलीकर यांनीही या पक्षात घराणेशाही रूजविली असून स्वतःच्या खासदारकीसह मुलाला किंवा मुलीला पुढील काळात आमदार करण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला शिंदे यांच्या सौभाग्यवतीनेच सुरूंग लावला आहे.
कंधार बाजार समितीच्या निवडणुकीत चिखलीकर यांना आव्हान देण्याचा आमदार शिंदे यांचा इरादा पूर्णपणे यशस्वी झाला नव्हता, पण त्यामुळे विचलित न होता त्यांनी लोहा बाजार समितीत आपल्या मेव्हण्याच्या गटाचा जबर पराभव करून त्यांना व भाजपला मोठा धक्का दिला.
चिखलीकर तरुण वयातच राजकारणात आले. त्यांच्या राजकीय पायाभरणीत सनदी अधिकारी राहिलेल्या शिंदे यांचे भक्कम पाठबळ त्यांना लाभले. त्याचा तपशील खूप मोठा आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही चिखलीकरांच्या मागे शिंदे यांचे बळ होते. खासदार झाल्यानंतर शिंदे यांना आमदार करण्यात चिखलीकर यांचे भरीव योगदान होते. पण त्यानंतर या दोन नेत्यांचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध बिघडत चालल्याचे वेगवेगळ्या घटनांतून समोर येत गेले.
त्यापूर्वी चव्हाण आणि खतगावकर यांच्यातील राजकीय संबंधही २०१५ ते २० दरम्यान बिघडले होते, पण खासदार होताच चिखलीकरांनी भाजपत रेटारेटी सुरू केल्यावर सुमारे दोन वर्षांपूर्वी खतगावकरांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसवापसी केल्यानंतर या पक्षाला दोन शक्तिस्थाने प्राप्त झाली. त्यातून त्यांनी बिलोलीच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला घसघशीत मतांनी निवडून आणले. चिखलीकर-शिंदे यांच्यातील ताणाताणी आधी सर्वांना एक ‘नाटक’ वाटले होते. पण दोघांतल्या ताणाताणीचे अनेक अंक जाहीरपणे समोर आल्यानंतर दोन परिवारांतील बिघाडावर शिक्कामोर्तब झाले असून अडचणीच्या काळात चिखलीकर आपल्या पक्षात एकाकी पडले आहेत.
मुखेड बाजार समितीत भाजपच्या गटाची संपूर्ण धुरा पक्षाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी वाहिली. बिलोली, उमरी व कुंडलवाडीत भाजपच्या उमेदवारांना खासदारांचे पाठबळ नव्हते. त्यांनी आपले सारे लक्ष आणि राजकीय प्रतिष्ठा लोहा बाजार समितीत पणाला लावली. या दरम्यान शिंदे आणि इतरांची खिल्ली उडवत खासदारांनी लोहा बाजार समितीत आपली सत्ता राखण्याचा दावा केला; पण निकालांती तो फोल ठरल्यानंतर लोहा-कंधार भागातील त्यांच्या वर्चस्वाचा फुगा फुटला आहे.
आणखी वाचा-काँग्रेसकडून ‘वंचित बहुजन’ला हाताच्या अंतरावर ठेवण्याचेच धोरण
चव्हाण आणि खतगावकर हे दोघे मागचे राग-लोभ विसरून एकत्र आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय नकाशावरील काँग्रेसचे चित्र ठळक होत असताना भाजपचे कमळ दलदलीत फसत असल्याचे दिसत आहे. बाजार समित्यांच्या निवडणूक निकालाने या पक्षाला पुढील धोक्याचा इशारा दिला आहे. पक्षाने पुन्हा चिखलीकरांना उभे करण्याचा किंवा त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्याचा प्रयोग केल्यास त्यांचा पराभव करण्याचा विडा प्रथम शिंदेच उचलतील, असे आता मानता येते.