दयानंद लिपारे
कोल्हापूर : राज्याच्या सत्ताधारी गटात राष्ट्रवादी अजितदादा गट समावेश झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट, भाजप यांच्या बरोबरीने हाही पक्ष सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा, विधानसभा या निवडणुकांसह गोकुळ दुध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती येथेही राजकीय फेरमांडणी होणार असून त्यामध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्वाची असणार आहे. महाविकास आघाडी समोरील आव्हाने वाढली आहेत.
अजित पवार यांच्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते हसन मुश्रीफ यांनीही शपथ घेतली. मुश्रीफ यांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. चंद्रकांतदादा पाटील यांनी तशी खुली ऑफर दिली होती. तेव्हा मुश्रीफ यांनी ‘शरद पवार एके शरद पवार’ असे म्हणत अढळ शरदनिष्ठा व्यक्त केली होती. त्यामुळे ते अजितदादांच्या बंडात दिसल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>>सांगलीत जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम राहणार ?
लोकसभा, विधानसभेवर परिणाम
शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित आल्याने त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्या रूपाने चांगलीच ताकद वाढली आहे. त्यांच्याबरोबर विनय कोरे व प्रकाश आवाडे हे भाजपला पाठिंबा दिलेले दोन आमदार असणार आहेत. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर यांच्याकडे भाजपचे नेतृत्व आहे. संजय मंडलिक, धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिवसेना शिंदे गटाचे आहे. मुश्रीफ हे या नव्या सत्ताधीशांमध्ये समाविष्ट झाल्याने कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्यासाठी निवडणूक सोपी बनताना दिसत आहे. धैर्यशील माने यांनाही याचा फायदा होणार असला तरी तेथे भाजपने दावा सांगायला सुरुवात केली आहे. मुश्रीफ यांच्या बरोबर चंदगडचे आमदार राजेश पाटील,जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आहेत. राधानगरी मतदारसंघ आणि बिद्री साखर कारखान्याची निवडणूक याचा विचार करून के. पी. पाटील हे यथावकाश निर्णय घेतील, पण ते मुश्रीफ यांच्या शब्दाबाहेर जातील असे दिसत नाही. बिद्री कारखाना के. पी. पाटील यांच्याकडे तर विधानसभा प्रकाश आबिटकर यांच्याकडे अशी वाटणी झाली तरी नवल वाटणार नाही.
हेही वाचा >>>नव्या घडामोडींमुळे आमदार बच्चू कडू यांचे समर्थक अस्वस्थ
‘मविआ’ची कसरत
महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा दबदबा वाढला होता. त्यातील मुश्रीफ हे प्रमुख नेतृत्व बाजूला गेल्याने ‘मविआ’ समोर राजकीय अडचणी वाढल्या आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी तुल्यबळ उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. हातकणगले मध्ये राजू शेट्टी यांच्याशी हात मिळवणी करण्याची वेळ आली आहे. विद्यमान विधानसभा मतदारसंघ राखून ठेवण्याचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.
हसन मुश्रीफ यांच्या प्रवेशाने नव्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात राजकीय पेच निर्माण झाला आहे. भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल मतदार संघात जोरदार तयारी चालवली आहे. आता येथे मुश्रीफ यांना उमेदवारी मिळणार असल्याने घाटगे यांना प्रतीक्षा करावी लागेल. चंदगड मध्येही राजेश पाटील हे विद्यमान आमदार ने उमेदवारीचे प्रबळ दावेदार असतील. येथेही मागील वेळी लढत दिलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील यांना थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
हेही वाचा >>>ठाण्यातील शिंदे गटाला आनंद परांजपे नकोसे
गोकुळ, जिल्हा बँकेत बदल
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांच्या सोबतीने गोकुळ दूध संघावर सत्ता मिळवून महाडिक यांच्या तीस वर्षाच्या सत्तेला शह दिला होता. मुश्रीफ यांनी वेगळा मार्ग चोखाळला असल्याने सहकारात बदलाची चिन्हे दिसत आहेत. मुश्रीफ,कोरे, नरके, आबिटकर, महाडिक, पी. एन. पाटील यांचा मिळून बहुमताचा १३ संचालकांचा आकडा गाठला जावून गोकुळ मध्ये सत्तासमीकरणाचे नवे नवनीत पुढे येईल असे दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत तर मुश्रीफ हेच अध्यक्ष आहेत. तेथे आता काँग्रेसकडे असलेले उपाध्यक्ष शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांना साथ दिली कि चौकशीचे लचांड आपसूक दूर होते असे अलीकडील राजकारणात दिसत आहे. हे पाहता जिल्हा बँकेच्या ईडी चौकशीचे शुक्लकाष्ट निघून जाईल. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीय, संस्था यांची चौकशी यथावकाश बासनात गुंडाळली जाईल. गेले काही दिवस तणावात असलेले मुश्रीफ यांची त्रासातून सुटका होऊन नव्या जोमाने ते राजकीय बांधणीला लागतील असे दिसत आहे.