पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात महायुतीमधील धुसफूस कमी होण्याऐवजी गेल्या काही दिवसांपासून वाढत चालली आहे. महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय वैर उघडपणे दिसून येत आहे.

भोसरी मतदारसंघात येत असलेल्या चऱ्होलीतील पीएमपीएमएलच्या ई- बस स्थानकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. मतदारसंघातील कार्यक्रम असतानाही आमदार लांडगे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येणे टाळले. त्यामुळे आगामी काळात पवार आणि लांडगे यांचा राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

महेश लांडगे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अजित पवार यांचेच कार्यकर्ते आहेत. भोसरीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचा विरोध डावलून २०१४ मध्ये अजित पवार यांनीच लांडगे यांना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष केले. स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाच लांडगे यांनी बंडखोरी करीत नाराजांची मोठ बांधून भोसरीतून अपक्ष निवडणूक लढविली. मोठ्या मताधिक्याने निवडून येत विधानसभा गाठली. आमदार झाल्यानंतरही काही महिने लांडगे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर २०१७ मध्ये लांडगे समर्थकांसह भाजपवासी झाले. त्यानंतर पवार आणि लांडगे यांच्यातील राजकीय संघर्षात वाढ होण्यास सुरुवात झाली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ‘नको बारामती, नको भानामती’, शहरातील निर्णय शहरातच’ अशी फलकबाजी करून लांडगे यांनी पवार यांना तीव्र विरोध केला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि लांडगे यांनी अजितदादांच्या गडाला सुरुंग लावला. महापालिकेवर कमळ फुलविले. त्याची सल पवार यांच्या मनात आहे. त्यातून पवार आणि लांडगे संघर्ष वाढीस लागला. महाविकास आघाडीचे सरकार असताना त्रास दिल्याची धारणा लांडगे यांची आहे. पुढे पवार भाजपसोबत आले. त्यामुळे लांडगे नाराज झाले होते.

भोसरी मतदारसंघातील विकासकामाचे लोकार्पण, भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते करण्यासाठी आमदार लांडगे हे आग्रही असतात. मतदारसंघातील कोणत्याही कामासाठी ते मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात. मात्र, पवार यांच्याकडे जाण्याचे कटाक्षाने टाळताना दिसतात. शहरातील कार्यक्रमात भाजपचे नेते आणि अजित पवार एकत्र असतील तरच लांडगे व्यासपीठावर येतात. त्यातही अजित पवार यांचे नाव घेण्याचे टाळतात.

शहराचा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच विकास झाल्याचा दावाही लांडगे करत असतात. त्यावरून पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर लांडगे यांना सुनावले होते. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाला अजित पवार येण्यापूर्वी आमदार लांडगे कार्यक्रमस्थळी आले. बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमस्थळावरून निघून गेले. पवार यांच्यासोबत व्यासपीठावर बसणे टाळले. क्रांतिवीर चापेकर बंधू जीवन प्रसंग दृकश्राव्य संग्रहालयाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभावेळी लांडगे हे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असताना पवार यांनी टाकलेला कटाक्ष बरेच काही सांगून जातो.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार लांडगे यांनी हजेरी लावली. मात्र, मतदारसंघात अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या पीएमपीएमएलच्या नवीन ई- बस स्थानक उद्घाटनसोहळ्याकडे पाठ फिरविली. माजी महापौरांसह भाजपचे स्थानिक एकही पदाधिकारीही फिरकला नाही. उलट राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी दिसून आले. आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या कालावधीत पवार आणि लांडगे संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच मी वरचेवर भेटत नसलो, शहरात जास्त येत नसलो, तरी पुण्याचा पालकमंत्री म्हणून जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. मुंबई, पुण्यात बसून पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताचेच निर्णय घेत असल्याचे पवार यांनी सांगत आपले शहराकडील लक्ष कमी झाले नसल्याचा दावा केला आहे.

मैत्री ग्रुपची अडचण

आमदार लांडगे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते. त्यामुळे राष्ट्रवादीत त्यांचा मित्र परिवार आहे. लांडगे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मिसाळ, उल्हास शेट्टी, प्रशांत शितोळे यांचा मैत्री ग्रुप आहे. दरवर्षी मैत्रीदिनी एकत्र येत हा दिवस ते साजरा करतात. परंतु, लांडगे हे अजित पवार यांना विरोध करत असल्याने ग्रुपमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मात्र अडचण होताना दिसून येत आहे.