रवींद्र जुनारकर

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्व पक्षांसाठी जिल्ह्यात आव्हानात्मक स्थिती आहे. कारण, खासदार व दोन आमदार असतानाही नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. भाजप आता पराभवातून यशाचा मार्ग काढण्यासाठी धडपडत आहे. तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे पालकमंत्री असले तरी या पक्षासमोर बरीच आव्हाने आहेत. काँग्रेस अंतर्गत लाथाळ्यातून बाहेर पडलेली नाही. तिकडे राष्ट्रवादी अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर पोहचलीच नाही.

नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम आदिवासी जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख. नक्षलवादावर पोलिसांनी येथे बऱ्याच अंशी विजय मिळवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण बहरत आहे. येत्या काळात जिल्हा परिषद व नगर परिषदेची निवडणूक होत आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात आज काँग्रेस पक्षाचा एकही आमदार नाही. चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाच काँग्रेस पक्षात शब्द चालतो. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे हे महागाई सोबतच विविध मुद्यांवर आंदोलन करून संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी तर निष्क्रिय आहेत. नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत टिकून राहायचे असेल तर संषर्घ करावा लागणार आहे.

खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांच्यासह या जिल्ह्यात भाजप मजबूत स्थितीत दिसत असली तरी नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर या पक्षाला बरेच कष्ट करावे लागणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गडचिरोलीत बोलावून आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करून भाजपने शक्तिप्रदर्शन केले. मात्र केवळ तेवढ्याने विजय मिळवता येत नाही याची जाण भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे.

या जिल्ह्यात शिवसेनेची शक्ती जेमतेम असली तरी नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेच्या सर्वाधिक जागा आल्या. तरीही एकनाथ शिंदेंना जिल्ह्यात पक्ष मजबूत करता आलेला नाही. ऑनलाइन बैठकांच्या माध्यमातूनच त्यांचे काम सुरू असल्याने शिवसैनिक नाराज आहेत. शिंदे यांनी सूरजागड येथे पोलीस बळाचा वापर करत आदिवासींचे आंदोलन दडपले. मात्र आता शिवसैनिकांनीच सूरजागड खाणीला तीव्र विरोध सुरू केल्याने आंदोलन चांगलेच पेटणार असे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम जोमात कामाला लागले आहेत. मात्र राष्ट्रवादीचा जनसंपर्क अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर नाहीच. भाजपचे माजी मंत्री अंबरिश आत्राम विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघात कुठेच दिसले नाहीत. आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून माजी आमदार दीपक आत्राम व अजय कंकडालवार यांनी आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून काम सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष यांची शक्ती या जिल्ह्यात खूपच कमी आहे.

Story img Loader