जयेश सामंत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : राज्यातील ७० जिल्हा अध्यक्षांची नावाची घोषणा करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच संघटनेत भाकरी फिरवली असली तरी ठाणे जिल्ह्यात नवे अध्यक्ष नेमताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मंत्री रविंद्र चव्हाण यांचा शब्द अंतिम मानण्यात आल्याची चर्चा आहे. नवी मुंबईत संदीप नाईक, मीरा-भाईदरला किशोर शर्मा, भिवंडीत ॲड.हर्षल पाटील आणि उल्हासनगरला प्रदीप रामचंदानी नेतृत्व पुढे आणताना चव्हाण सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असा कारभार यापुढे जिल्ह्यातील भाजपमध्ये चालेल असा संदेश यानिमीत्ताने वरिष्ठांकडून दिला गेल्याचे या नियुक्त्यांमुळे स्पष्ट होत आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदलांची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु झाली आहे. राज्यातील विधानसभेच्या निवडणुक प्रतिनिधींची नेमणुक करताना काही ठिकाणी विद्यमान आमदारांच्या निकटवर्तीयांना तर इतर ठिकाणी इच्छुक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शहरांमधील पक्षाच्या अध्यक्षांची तीन वर्षांची मुदत संपली आहे तेथे नवे अध्यक्ष नेमले जातील अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या अंतर्गत वर्तुळात होती. त्यानुसार ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली यासारख्या शहरांमध्येही नवे अध्यक्ष दिले जातील अशी शक्यता होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजप संघटनात्मक नियुक्त्या करताना कोणत्या धोरणाचा अवलंब करते याकडे सर्वांच्या नजरा होत्या. तसेच या नियुक्त्या करताना कोणाचा वरचष्मा रहातो याविषयी देखील उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सहा जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना झुकते माप दिल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून तूर्त तलवारी म्यान?

मुख्यमंत्र्यांना पोषक पदाधिकारी ?

राज्याचे मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या आक्रमक राजकारणामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपमध्ये कमालिची अस्वस्थता आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरात तर भाजपमधील एक मोठा गट शिंदे यांच्या निकटवर्तीयांशी अंतर राखून रहावे या मताचा आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर हे अनेकदा शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेतील कारभारावर टिकेची झोड उठविताना दिसतात. डोंबिवलीतही मध्यंतरी भाजपने आक्रमक भूमीका घेत खासदार शिंदे यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. नवी मुंबईत माजी मंत्री गणेश नाईक यांचा एकहाती वरचष्मा असला तरी त्यांचेही मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांशी सख्य नाही. भिवंडीच्या ग्रामीण पट्टयात भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे फारसे जमत नाही. या विसंवादाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजपने शिंदे गटाला सोयीचे ठरतील अशा संजय वाघुले यांच्याकडे अध्यक्षपद देऊ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असलेले वाघुले यांचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांशी कमालिचे सख्य राहीले आहे. भाजपमध्ये असूनही त्यांची भूमीका मुख्यमंत्र्यांच्या पक्षाशी सुसंगत असल्याचे चित्र यापुर्वीही अनेकदा पहायला मिळाली आहे. मावळते अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी देखील नेहमीच मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या वागणुकीमुळे अस्वस्थ असलेल्या भाजपमधील अस्वस्थ गटालाही त्यांनी नेहमीच सोबत ठेवल्याचे पहायला मिळाले. वाघुले यांना ही कसरत जमेल का अशी चर्चा आता स्थानिक पातळीवर सुरु झाली आहे. निरंजन डावखरे यांना अध्यक्षपदाची संधी पुन्हा दिली जावी यासाठी पक्षातील एक मोठा गट आग्रही असताना चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले वाघुले यांची नियुक्ती करत पक्षाने ठाण्यात मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

हेही वाचा… किमान वेतन हमी आणि आरोग्य कायद्यांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना राजकीय फायदा ?

चव्हाण यांचाच वरचष्मा

कल्याण डोंबिवलीचे अध्यक्षपदी नरेंद्र सुर्यवंशी यांची नियुक्ती करत असताना उल्हासनगरात भाजपचा आक्रमक तरुण चेहरा प्रदीप रामचंदानी यांना संधी देण्यात आली आहे. रामचंदानी आणि स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्यात फारसे सख्य नसल्याची चर्चा असून येथेही चव्हाण यांनी आपले वजन रामचंदानी यांच्या बाजूने खर्च केल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या कुटुंबियापैकी कुणाचाही विचार अध्यक्षपदासाठी केला जाऊ नये असा आग्रह बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या गटाने धरला होता. संघाच्या गोटातही याविषयी काही प्रमाणात संभ्रम होता. असे असताना येथेही संदीप नाईक यांची नियुक्ती करताना रविंद्र चव्हाण यांचे मत विचारात घेण्यात आल्याची चर्चा आहे. इतकी वर्ष केवळ संविधानीक पद भूषविणाऱ्या नाईक कुटुंबाला यावेळी पहिल्यांदाच पक्ष संघटनेत काम करावे लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political strength of ravindra chavan increased in thane bjp print politics news asj