कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा पारा चढू लागला आहे तसतसे कागल मतदारसंघातील पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शरदचंद्र पवार काँग्रेसचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्यातील वादाने टोक गाठले आहे.

एकमेकांवर बेताल टीका केली जात आहे. मुश्रीफ यांनी घाटगे यांना उद्देशून हा राजा आहे की भिकारी? अशी बोचरी टीका केल्यानंतर घाटगे यांनी निष्ठा विकणारा मंत्री अशी मुश्रीफ यांची निर्भत्सना केली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पराभव समोर दिसू लागल्याने तोंडून चुकीचे शब्द आहेत, अशी टीका मुश्रीफ यांना उद्देशून केली आहे.

हे ही वाचा… साकोलीतील वर्चस्व अबाधित राखण्यासाठी फुकेंची धडपड; मर्जीतील उमेदवार देण्यासाठी खटाटोप

विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले गेले आहे.कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या कागल मध्ये अजित पवार यांना साथ मिळवत पालकमंत्रीपद खिशात टाकून विकास निधीच्या माध्यमातून कामांचा धडाका उडवलेले हसन मुश्रीफ आणि भाजपचा राजीनामा देऊन तुतारी हाती घेत प्रचाराला वेग दिलेले समरजीत घाटगे यांच्यात जुगलबंदी रंगली आहे.

एका प्रचार सभेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी महायुतीत असताना घाटगे यांची कार्यशैली कशी होती यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी यांची बरीच काम केली. घाटगे प्रत्येक आठवड्याला तीस-पस्तीस कामांची यादी घेऊन फडणवीस यांच्याकडे जात असतं . सरकारी अधिकाऱ्यांच्या बदलीची दलाली करण्याचे काम यांनी केले. मग हा राजा आहे की भिकारी? असा खोचक सवाल मुश्रीफ यांनी घाटगे यांना उद्देशून केला. शरद पवार यांचे साथ सोडण्याचे समर्थनही मुश्रीफ यांनी केले. शरद पवार आमचे दैवत होते. नेहमीचं राहणार. त्यांना सांगून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही काम करणारी प्रवृत्ती आहे तर विरोधक खोडा घालणारे आहेत, अशी टीका त्यांनी घाटगे यांच्यावर केली.

हे ही वाचा… राजेंद्र शिंगणे यांची ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका!; घड्याळ की तुतारी? विरोधकांसह मित्रपक्षही संभ्रमात

त्यांच्या टिकेला समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ निष्ठा विकून आल्यामुळे रात्री त्यांना झोप येत नाही. आधी देखील त्यांनी अनेक वेळा निष्ठा विकली आहे, अशा शब्दात चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुश्रीफ हे जुगलबंदी निर्माण होऊन कागलचे नाव खराब व्हावे अशा भूमिकेत आहेत. त्यांनी चुकीची विधाने करून कागलच्या जनतेचा अपमान केल्याबद्दल मतदारांची माफी मागावी, अशी मागणी घाटगे यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र डागले. कागल मधील एक नेते पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार एकदाच मतदार संघात येऊन गेले. तो खरा ट्रेलर होता. खरा सिनेमा मतदानावेळी दिसेल. ट्रेलरमुळे नेत्याचा तोल ढळू लागला आहे. समोर पराभव दिसू लागल्याने तोंडून चुकीचे शब्द येत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे. निवडणुकीच्या थेट प्रचाराला सुरुवात झाली असताना जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांतील वाद चिघळतो कि त्यांच्यातील संयमाचे दर्शन घडते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.