दयानंद लिपारे

कोल्हापूर : साडेतीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाची सत्ता बदलली म्हणून वार्षिक सभेतील वाद, गोंधळ संपला आहे असे घडले नाही. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सत्तेच्या चाव्या गेल्या असल्या तरी त्याविरोधात आता विरोधी महाडिक गटाने आव्हान दिले आहे. याद्वारे विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणचे विधानसभेचे मैदान तयार करायला सुरुवात केली आहे. तर अमल महाडिक यांच्या राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सतेज पाटील गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघ (गोकुळ) हा राज्यातील सहकारातील सर्वात मोठा तितकाच बदनाम होत राहिलेला संघ. पाच साडेपाच लाखावर दूध उत्पादकांशी संबंध येत असल्याने जिल्ह्याचे राजकारण करता येते. मुख्य म्हणजे सत्तेत असले की त्याचे आर्थिक फायदे हे अगणित. अगदी राज्याच्या प्रमुखांनाही गुंडाळण्याची त्यात ताकद. किंबहुना या अर्थकारणावरूनच तर सत्तेचे नवनीत सुरू असते. यापूर्वी गोकुळमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एक हाती सत्ता होती. त्यातील गैरव्यवहारावर प्रहार करीत शेकाप, शिवसेना यांच्या मदतीने सतेज पाटील यांनी आव्हान देत सत्ता मिळवली; तेव्हा त्यांना हसन मुश्रीफ यांचीही साथ लाभली. गेली अडीच वर्षे पाटील – मुश्रीफ यांचेच गोकुळवर वर्चस्व राहिले आहे.

आणखी वाचा-मध्य प्रदेश : भाजपाला मोठा धक्का! बड्या ओबीसी नेत्याचा राजीनामा, काँग्रेसमध्ये प्रवेश

पाटील – महाडिक झुंज

सत्ता गेली असले तरी महाडिक गट काही शांत राहिलेला नाही. विरोधात निवडून आलेल्या अन्य तीन संचालकांनी सत्ताधारी गटाच्या पंक्तीत स्वतःहून ताट लावत लाभार्थी होण्याचे फायदे चाखायला सुरवात केली असताना महाडिक यांच्या स्नुषा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी विरोधी गटाचा मोर्चा एकट्याने पेलला आहे. गोकुळच्या वार्षिक सभेवेळी महाडिक यांनी २१ प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. त्यांनी सतेज पाटील यांनाही टँकर शिवाय गोकुळमधील काही कळत नाही, अशी टीका केली. त्यांनी सभेमध्ये बोगस सभासद आणल्याचा आरोपही केला. सतेज पाटील यांनी महाडिक यांनी सभासद म्हणून गुंडांना आणल्याचा आरोप केला. पाटील – महाडिक यांच्यातील राजकीय वाद असा मागील पानावरून पुढे सुरू राहिला आहे.

विधानसभेचे रण

अर्थात त्याला आगामी विधानसभा निवडणुकीची ही किनार आहे. कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात सतेज पाटील निवडून येत असत. २०१४ च्या निवडणुकीत तेथे अमल महादेवराव महाडिक हे विजयी झाले. गेल्या निवडणुकीत अमल महाडिक यांचा सतेज पाटील यांचे पुतणे ,काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी पराभव केला. आता या मतदारसंघात अमल यांच्याबरोबरीने शौमिका महाडिक यांनी भाजपकडून लढण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी गोकुळच्या तापत्या मैदानाचा खुबीने वापर करीत प्रतिमा निर्मितीवर भर दिला आहे. दुसरीकडे, महाडिक यांच्या राजाराम साखर कारखान्यात सत्ता मिळवण्याचे सतेज पाटील यांचे प्रयत्न थोडक्यात हुकले. निवडणूक झाल्यानंतर नुकताचआलेला सहकार विभागाचा निकाल हा सतेज पाटील यांच्या बाजूने झाला असल्याने या गटाचे मनोबल वाढले आहे. राजाराम च्या आगामी वार्षिक सभेमध्ये अमल महाडिक यांना भिडायला आमदार पाटील समर्थकांनी सुरुवात केली आहे. या आव्हान – प्रतिआव्हानातून कोल्हापूर दक्षिणचा मतदारसंघातीळ दोन तुल्यबळ घराण्यातील वादाला नव्याने फोडणी मिळाली आहे.

आणखी वाचा-पालघरमध्ये उमेदवारीसाठी भाऊगर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चुकांची पुनरावृत्ती

सत्ता मिळवणे सोपे असते पण ती टिकवणे अवघड असते. सत्तेचे अनेक वाटेकरी होतात; त्यात नातलग ओघानेच आले. त्यातून चालणाऱ्या वाटाघाटी, अर्थपूर्ण व्यवहार कर्णोपकर्णी व्हायला वेळ लागत नाही. त्यातून जायचा तो संदेश जातच असतो. गोकुळ मध्ये आपले काम चांगले असल्याचा दावा आजवरचा सत्ताधारी गट अनेक वर्षे करीत आला आहे. पण ते कसे चांगले चालू आहे, हे पटवून देण्याची एक किमया, कौशल्य असते. त्याबाबतीत गोकुळचे कालचे आणि आजचे दोन्ही सत्ताधारी खूपच मागे आहे. दूध उत्पादक सभासदांपर्यंत योग्य काम पर्यंत पोहोचवण्याची खुबी त्यांना साध्य करता आली नाही. मागील सत्ताधाऱ्यांतही अनेक गुण होते, पण त्यांचे सक्षम सादरीकरण सभासदांपर्यंत पोहोचले नाही. परिणामी सत्तेला तिलांजली द्यावी लागली. आताचे अध्यक्ष, संचालक त्यापेक्षा वेगळ्या वाटेने जाताना दिसत नाहीत. अर्थात, आजचे सत्ताधारी प्रमुख हे त्यांच्या मागील नेत्यांचेच सहकारी होते. निवडणुकीच्या वेळचे वातावरण पाहून त्यांनी या गटातून त्या गटात जाणे पसंत केले. अगदी विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे आणि आधीचे अध्यक्ष विश्वास पाटील हे दोघेही पूर्वी महाडिक यांच्या गळ्यातीळ ताईत होते. आता त्यांनी सत्तेसाठी पाटील मुश्रीफ यांच्याशी जवळीक साधली आहे. सत्ता मिळाली तरी ती टिकवून ठेवणे हे बिकट आव्हान आहे.