कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती घराण्यातली श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक वलयांकित बनली असताना हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला जात आहे. कधी गादीचा वारसदार असा वादग्रस्त मुद्दा पुढे आणला जात आहे तर कधी मान गादीला मत मोदीला असे म्हणत विरोधकांकडून हवा तापवली जात आहे. गादी ही कोल्हापूरची अस्मिता असल्याने जनता या बाजूनेच उभी राहील, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे रण तापले आहे. सावधपणे, विचारपूर्वक मुद्दे प्रचारातून पुढे आणले जात आहेत. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्याविषयी आदर असल्याचे सांगून टीकात्मक काही बोलणार नाही अशी सुरुवात केली होती. आठवडाभरातच त्यांनी पवित्रा बदलला आहे. महायुतीकडून थेट शाहू महाराज यांचे नाव न घेता कोल्हापूरच्या गादीला गादीवरून आव्हान द्यायला सुरुवात केली आहे.
मराठेशाहीच्या इतिहासात कोल्हापूर व सातारा या छत्रपतींच्या गादींना महत्त्व आहे. विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत दोन्ही राजघराण्यातील छत्रपतींनी उडी घेतली आहे. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला आहे. त्याआधी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात लढणारे खासदार संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. मंडलिक यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनात तोडीस तोड असे शक्ती प्रदर्शन शाहू महाराज यांनी केले. त्यांचा अर्ज भरताना महा विकास आघाडीतील प्रमुख नेते नव्हते. त्यावरूनही टीकाटिपणी होत राहिली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारावर लक्ष केंद्रित केले जात आहे. शाहू महाराज यांच्या विषयी आदर व्यक्त करणाऱ्या विरोधकांनी हळूच त्यांना भिडणारे वक्तव्य करायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा… चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार? आसामात काय आहेत राजकीय समीकरणं?
सूत्रबद्ध रणनीती
त्याकरिता महायुतीकडून सूत्रबद्ध रणनीती ठरवली आहे. आधी समाज माध्यमात संदेश अग्रेषित करून चाचपणी करायची. त्यावर कसा प्रतिसाद येतो हे आजमावायचे. तो प्रभावी ठरतो असे दिसले की त्यावरून सभा, मेळाव्यांमधून थेट टिकेची तोफ डागण्याची, अशी हि व्यूहरचना आहे. याचे पहिले पाऊल म्हणून सर्वात आधी कोल्हापुरात गेल्या पंधरा दिवसापासून ‘ मान गादीला .. मतमोदी’ ला अशा आशयाची मोहीम चालवली. समाज माध्यमात असे संदेश दिसू लागल्यावर त्यावरून समर्थन, विरोधकाचे मुद्दे – प्रतिमुद्दे मांडले जाऊ लागले. हा मुद्दा कुठेतरी जनतेला, तरुण पिढीला भावतो असे लक्षात आल्यावर आता तर थेट उमेदवार संजय मंडलिक यांनीच तो उचलून धरला आहे. वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचार दौऱ्यात बोलताना खासदार मंडलिक यांनी ‘ गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहिताच्या कल्याणकारी योजना राबवल्याने पुन्हा त्यांचे सरकार येणार आहे. त्यामुळे कोल्हापुरात मान गादीला आणि मत मोदींना असा जनप्रवाह तयार झाला आहे ,’ असे म्हणत या मुद्द्याला जाहीरपणे तोंड फोडले आहे. तथापि हा मुद्दा कोल्हापुरात टिकणार नाही अशी बाजू काँग्रेस कडून मांडली जात आहे. ‘ कोल्हापूरची गादी हि जनतेची अस्मिता आहे. करवीरची जनता राजाच्या बाजूने उभी राहील. काहीही झाले तरी कोल्हापूरकर मान आणि मत गादीलाच देणार , असा दावा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी केला आहे. शाहू महाराज यांनी याला जनताच मतदानातून उत्तर देईल, अशा शब्दात प्रतित्तूर दिले आहे.
मोदी विरुद्ध गादी
राज्यातही अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीकडून उमेदवार – उमेदवारांची लढाई असल्याचे न म्हणता त्याला राष्ट्रीय पातळीवरील स्वरूप देण्यावर भर दिला आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई असल्याची मांडणी केली जात आहे. अगदी बारामती मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या सारख्या प्रभावी, दिग्गज उमेदवारांमध्ये संघर्ष होत असतानाही ती उमेदवारांची लढत असे स्वरूप देण्याऐवजी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातील सामना असल्याचे वर्णन केले जात आहे. कोल्हापुरात मात्र मोदी विरुद्ध गांधी हा मुद्दा टाळण्यात आला आहे. येथे मोदी विरुद्ध गादी असा मुद्दा आणून शाहू महाराजांना लक्ष्य केले जात आहे. प्रचारामध्ये शाहू महाराजांना टीकेचे लक्ष्य करायचे का यावरून महायुतीमध्येही मतभेदाची सूक्ष्म किनार दिसून येते. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांचे स्थान अबाधित ठेवायचे असेल तर वैयक्तिक टीका करणे टाळावे. शाहू महाराज यांच्या बद्दल आमच्या मनात आग्रहाचे स्थान आहे. आमच्यावर वैयक्तिक टीका होऊ लागली तर आम्हीही उत्तर दिलं तर आदराचे स्थान कुठे जाईल, असे नमूद करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसंग पडला तर महाराजांना भिडण्याची तयारी ठेवावी लागेल असा इशारा दिला आहे. यामुळे कोल्हापूरची निवडणूक गादी विरुद्ध मोदी अशी रंगात असताना मतदारांचा कल कसा राहणार याचीही उत्सुकता वाढली आहे.