सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा वार्षिक आराखडा निधी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. निधीवाटपात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघाला जादा निधी दिला जात असल्याने काँग्रेस व ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये आधीच नाराजीची भावना असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये यावरून ठिणगी पडली आहे.

कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी निधी वाटपातील असमानतेवर बोट ठेवत पालकमंत्र्यांवर टीका केली. त्याला समर्थन देण्यासाठी दानवे यांनीही जिल्हा नियोजनाचा निधी म्हणजे पालकमंत्र्यांची जहागिरी नसते असे सुनावले. त्याला भुमरे यांनीही प्रत्युत्तर देत ‘होय, आता आमचीच जहागिरी आहे,’ असे उत्तर दिले. भुमरे यांच्या समर्थनार्थ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारही उतरले. त्यामुळे जिल्हा नियोजनाच्या बैठकीत सोमवारी काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, अशा बाबी घडत असतात. अंबादास दानवे हे सहकारी आहेत, त्यांनी कोणतीही धमकी दिली नसल्याचा खुलासा पालकमंत्री भुमरे यांना करावा लागला.

हेही वाचा >>>गुजरातमध्ये आप-काँग्रेस एकत्रपणे लोकसभा लढविणार; ‘आप’ची घोषणा, काँग्रेसचा सावध पवित्रा

कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत म्हणाले, ‘जेव्हापासून रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे पालकमंत्री झाले आहेत तेव्हापासून कन्नड विधानसभा मतदारसंघातील एकही काम मंजूर झालेले नाही. जो निधी मंजूर केला आहे, त्याचा प्राधान्यक्रम चुकला आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काही गावांना रस्ता नाही. तेथील अनेक वयोवृद्ध मंडळी अक्षरश: रडून व्यथा मांडतात. किमान गावातून बाहेर दिलेल्या लेकीची तरी भेट घडवून आणा, अशी विनंती करतात. पण त्या गावांना निधी मिळत नाही. या गावांच्या निधीसाठी पालकमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली. पण त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला. कोणी ऐकूनच घेत नसल्याने शेवटी मी हातातील कागदही फेकली. याच वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रश्नी जाब विचारला. आमदार उदयसिंह राजपूत जेव्हा आक्रमक झाले होते त्यांच्या समर्थनार्थ दानवे यांनीही हा निधीवाटप करणे ही काही जहागिरी नाही. त्याचे निकष ठरलेले आहेत असे सांगत पालकमंत्र्यांना सुनावले. अंबादास दानवे आक्रमक झाल्याचे दिसताना मंत्री सत्तार भुमरे यांच्या समर्थनार्थ उतरले. सत्ताधारी गटाचे औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना फक्त साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि आमदार उदयसिंह राजपूत यांना साडेबारा कोटी, मग जैस्वाल यांच्यावर अन्याय झाला असे म्हणायचे का, असा सवाल करत भुमरे यांनी निधीचे न्याय्य वाटप होत असल्याचा दावा केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics and arguments in full swing between minister and opposition leader on fund distribution issue in aurangabad district print politics news amy
Show comments