दीपक महाले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव : भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा तयार झालेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वैर दिवसेंदिवस एकेक वरचा टप्पा गाठत आहे. त्यात आता भरचौकात जोडे मारण्याचे आव्हान देण्यापर्यंत मजल गेली आहे. अलीकडेच खडसे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यावर खडसेंनी १३७ कोटींची नोटीस आल्यानंतर हृदयविकाराचे नाटक केल्याची टीका महाजन यांनी केली होती. त्यावर खडसेंनी महाजनांची साठी बुद्धी नाठी असे झाले असून, आता त्यांना काही सुचत नसल्याचे उत्तर दिले होते. नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात आता दोघांच्या समर्थकांनीही उडी घेतल्याने वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.

सिंचन प्रकल्पांचे जाळे उभारणारे खडसे हे भगीरथ ठरतात, तर आरोग्यसेवेमुळे महाजन हे आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे दोघांचे या जिल्ह्यासाठी आपापल्या परीने व क्षमतेनुसार विशेष योगदान आहे. तीन दशकांपेक्षा अधिक काळ हे दोघे एकाच पक्षात अर्थात भाजपमध्ये रमले होते. १९९० ते २०१० ही दोन दशके दोन्ही भाऊंनी राजकीयदृष्ट्या चांगलीच गाजवली. नंतरच्या काळात एकाच पक्षात असूनही दोघांमध्ये वर्चस्वाच्या मुद्यावरून मतभेद निर्माण झाले. २०१४ नंतर ते अधिक ताणले गेले. २०१६ मध्ये फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून खडसेंना राजीनामा द्यावा लागल्यानंतर हे मतभेद अधिकच टोकाला पोहोचले. आता खडसे राष्ट्रवादीत असल्याने दोघे कट्टर वैरीच झाले आहेत.

हेही वाचा… जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय घेऊनही भाजपच्या वाट्याला अपश्रेयच

मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी संकटमोचकांनी पुढाकार घ्यावा, या आमदार खडसेंच्या वक्तव्यावर मंत्री महाजन यांनी खडसेंनी अगोदर त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. सगळे प्रश्न आपोआप सुटतील, असा चिमटा काढला. एकीकडे ढोंग करायचे, सोंग करायचे आणि १३७ कोटींची नोटीस आल्यानंतर दवाखान्यात जाऊन बसायचे आणि दुसरीकडे भाष्य करण्यास तयार व्हायचे. तब्येत बिघडली म्हणून मुख्यमंत्र्यांकडून विमान मागवायचे. कसली तब्येत खराब आहे ? नुसती नोटीस आल्यामुळे न्यायालयाकडून सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी आजारपणाचे नाटक केले, असे महाजन यांनी खडसेंना डिवचले. त्यावर खडसेंनी वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना महाजन यांनी स्त्रीरोगांकडे अधिक लक्ष दिल्यामुळे त्यांचे हृदयरोगांकडे कमी लक्ष गेल्याचा टोला हाणला. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागात जे चाळे केले, त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली. माझ्या वैद्यकीय कागदपत्रांची खात्री करावी. माझा आजार खरा आहे की खोटा, हे त्यांनी तपासून घ्यावे. सहानुभूतीसाठी मी हे केल्याचे त्यांनी सिद्ध केल्यास महाजनांनी मला भरचौकात जोडे मारावेत. मात्र, माझी कागदपत्रे खरी असल्याचे सिध्द झाल्यास महाजनांना भरचौकात मी जोडे मारायला तयार आहे. महाजन यांनी हे आव्हान स्वीकारावे, असे आव्हानच खडसे यांनी दिले.

हेही वाचा… राजकीय दिशा बदलू शकणारे आंबेडकरी शक्तिप्रदर्शन, वंचित आणि काँग्रेसची जवळीक ?

खडसे आणि महाजन यांच्या वादात समर्थकांनीही उडी घेतली आहे. खडसे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याने महाजनांच्या प्रतिमेस शाई लावत, जोडे मारत शरद पवार गटातर्फे निषेध व्यक्त करुन खडसेंनी दिलेले आव्हान महाजनांनी स्वीकारण्याचे आवाहन केले. महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी, मनोरुग्ण महाजन यांनी यमुनेचा काठावर बसून हवेत तीर मारू नयेत. मुख्यमंत्र्यांनीच खडसेंसाठी मुंबई येथे उपचारासाठी हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती आणि त्याच मुख्यमंत्र्यांवर महाजन यांचा विश्वास दिसत नाही, असे लक्षात येते, असे मत व्यक्त केले. दुसरीकडे महाजनांच्या प्रतिमेस शाई फासल्यामुळे भाजपतर्फे दुग्धाभिषेक करुन खडसेंच्या प्रतिमेस महिला पदाधिकाऱ्यांनी चपलांनी मारत, त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics and controversial statements between eknath khadse and girish mahajan print politics news asj