शिरुर : शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या विरोधात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे . शिरूरमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांचा पराभव करून अशोक पवार हे निवडून आले होते.

आमदार अशोक पवार हे तालुक्याच्या राजकारणात अजित पवार यांचे समर्थक मानले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार पवार हे अजित पवार यांच्या पक्षात जातील, असे बोलले जात होते. मात्र आमदार अशोक पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहत आपला पाठींबा शरद पवारांनी जाहीर केला. शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर जोमाने प्रचार करत आमदार पवार यांनी कोल्हे यांच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

हे ही वाचा… मावळतीचे मोजमाप: महिला-बालकल्याण; लोकसंख्येत निम्म्या असलेल्या महिलांच्या विकासाबाबत निव्वळ चर्चा

या मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार निवडणूक लढविणार असल्चाची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला आहे. बारामतीमधून निवडणूक न लढविण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले असून त्यादृष्टिने चाचपणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस शिरुर येथील न्हावरा येथे बोलत असताना अजित पवारांनी यांनी अशोक पवार हे आमदारच कसे होतात, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अशोक पवारांना घेरण्यासाठी अजित पवार कोणती नीती व डावपेच अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरुर येथे झालेल्या जाहीर सभेत शिरूरच्या मंत्रिपदाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार अशोक पवार यांना मंत्री करू असे जाहीर केले आहे. शिरूरबाबत दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर आमदार अशोक पवार हे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार शरद पवारांच्या बरोबर राहिले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर अशोक पवार हे मंत्री होणार हे निश्चित असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.

हे ही वाचा… ‘बारामती’साठी शरद पवारांची नवी खेळी? इच्छुकांच्या मुलाखतीसाठी युगेंद्र पवार आलेच नाहीत

शिरूरच्या राजकारणात मागील अनेक वर्षापासून महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले. विधानसभेच्या सहा निवडणुका लढविण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. सहा पैकी दोन वेळा ते भाजपाचे उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून गेले. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेस आय, अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आमदार पाचर्णे यांना मानणारा मोठा मतदार या मतदारसंघात आहे. आमदार पाचर्णे ज्या बाजूला जातील त्या बाजूला जाऊन मतदान करणारा हा मतदार होता. साहजिकच पाचर्णे यांच्या निधनानंतर त्यांचे हे हक्काचे मतदार कोणत्या बाजूने झुकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विद्यमान आमदार अशोक पवार हे अभ्यासू , उच्चशिक्षित व प्रशासनावर पकड असणारे व साखर धंद्यातील जाणकार आहेत. शरद पवार ,सुप्रिया सुळे यांची भरभक्कम साथ त्यांच्या पाठीशी आहे . दोन वेळेस शिरूरचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे . त्यामुळे आजच्या स्थितीत विधानसभेला त्यांचे पारडे जड मानले जात आहे. शिरूर तालुक्याची कामधेनू असणारा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना मागील एक वर्षापासून बंद आहे. या कारखान्याचे १८ हजाराहून अधिक शेतकरी सभासद असून कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. पवार यांच्या विरोधकांनी घोडगंगा बंद असल्यामुळे तालुक्यात पदयात्रा काढून अशोक पवारांना या विषयावरुन घेरले आहे. त्याचबरोबर भाजपाचे उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांनीही घोडगंगा कारखान्याच्या विषयावर आंदोलने केली आहेत त्यामुळे घोडगंगा बंद असल्याचा फटका कारखाना विधानसभेच्या निवडणुकीत पवारांना बसणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मी सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलो नाही, त्यामुळे कारखान्याला मदत व कर्ज नाकारले जात असल्याचा जात असल्याचे आमदार पवार यांचे म्हणणे आहे. हा मुद्दा निवडणुकीच महत्त्वाचा ठरणार आहे. या मतदारसंघात अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे अशोक पवार यांना सोपी वाटणारी निवडणूक अवघड बनू शकते.

हे ही वाचा… मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची महायुतीला घाई नाही – शंभूराज देसाई

भारतीय जनता पक्षाने शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी तयारी केलेली असून पक्षाचे उमेदवार यापूर्वी या मतदारसंघात विजयी झाल्याने हा मतदारसंघ भाजपला सुटला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. सध्या भाजपाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे त्याचबरोबर दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, पक्षाचे उद्योग आघाडीचे संजय पाचंगे यांची नावे चर्चेत आहे. कंद यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले असून त्या माध्यमातून मतदार संघात केलेली विकास कामे त्याचबरोबर अभ्यासू ही प्रतिमा या त्यांच्या जमेच्या बाजू आहे तर भाजपच्या पलांडे यांनी यापूर्वी शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आहे. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे हक्काची असणारी मतपेढी ही राहुल पाचर्णे यांची जमेची बाजू आहे. संजय पाचंगे यांनी टोल सह विविध प्रश्नांवर आंदोलन केलेली आहेत . त्यांनाही माननारा मतदार वर्ग आहे .

हे सर्व विधानसभे करिता इच्छुक असले तरी जागा वाटपात ही जागा भाजपाच्या वाट्याला येणार की राष्ट्रवादीच्या यावरच पुढची गणिते अवलंबून आहे .त्याचबरोबर ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्यास वरील इच्छुकांपैकी कोणी बंडाचा झेंडा हाती धरला तर शिरूरची निवडणूक अधिक रंगतदार होईल हे निश्चित. त्याचबरोबर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कटके हेही उमेदवारी करिता इच्छुक आहेत.

हे ही वाचा… सत्तेसाठी ‘वाट्टेल ते’…

महाआघाडीत शिरूर ची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे आहे. असे असले तरी शिवसेने (ठाकरे ) चे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके हे सुद्धा उमेदवारी करिता दावेदार आहेत. मागील काही वर्षापासून मतदार संघाची त्यांनी बांधणी केली आहे . त्यांनी मतदारसंघातील वीस हजारहून अधिक नागरिकांना त्यांनी उज्जैन वारी करून आणली आहे . कटके हे सेनेचे उमेदवार असणार की इतर पक्षाचा झेंडा हाती घेणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.