जळगाव : जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्था परिस्थितीवरुन आरोपांच्या फैरी झाडत शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे हजरजबाबी स्वभावासाठी प्रसिद्ध असून, सडेतोड वक्तव्य करून अंगावर आलेल्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यातही ते वाकबगार आहेत. असे असताना, जळगाव जिल्ह्यात अलिकडे घडलेल्या काही घटना सत्ताधाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील एका गावात शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी उपसरपंचाची हत्या झाल्यानंतर धरणगावात अल्पवयीन मुलीने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावरून एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री पाटील यांना लक्ष्य केले. पोलिसांचा धाक न राहिल्याने जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था बिघडल्याच्या मुद्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. दुसरीकडे, वडिलांचा धागा पकडून रोहिणी खडसे यांनीही पालकमंत्री पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणे म्हणजे पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील मुली सुरक्षित नसल्याचे दिसून येते. पालकमंत्री जिल्ह्यातील मुलींना काय सुरक्षित वातावरण देणार आहेत, असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. न्याय मिळण्यासाठी जर मुलींना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत असेल, तर पालकमंत्री गुलाबराव पाटील तिथे कमी पडले. लाडका भाऊ म्हणून घेण्याचा त्यांना काहीएक अधिकार नाही. फक्त मते मिळवण्यासाठी त्यांनी लाडक्या बहिणींचा निवडणुकीत वापर केला. मुलींना बरोबर चाकू आणि मिरची पावडर बाळगण्याचा सल्लाही आता ते देऊ लागले आहेत, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
दरम्यान, या आरोपांना पालकमंत्री पाटील यांनीही उत्तर दिले आहे. कोण कोणाचा विरोधक हे सरकारला कळत नसते. कायदा सुवस्थेची स्थिती बिघडू न देणे सरकारची जबाबदारी आहे. समाजानेही त्यासाठी सहकार्य केले पाहिजे. मात्र, अपूर्ण माहितीवर जर कोणी बोलत असेल तर ते खोटे आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीला शिवसेनेच्या रुग्णवाहिकेतूनच रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे आम्हाला त्याची माहिती मिळाली. घटनेनंतर अर्ध्या तासाच्या आत जिल्हा रुग्णालयात पोहोचलो होतो. संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणते कलम लागले ते न पाहता, पोलिसांचा जबाब न पाहता, गावात कोण साक्षीदार आहेत ते न पाहता, कोणत्याही मुलीच्या बाबतीत असे आरोप करणे आणि जिल्ह्याची वाट लागली आहे, असे म्हणणे उचित ठरणार नाही. हे जळगाव जिल्ह्यास मुद्दाम बदनाम करण्याचे विरोधी पक्षाच्या आमदारांचे षडयंत्र आहे. मलाही मुलगी आहे. आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल, असे आरोप न करण्याचे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.