अमरावती : मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवेचे संचालन करणाऱ्या अलायन्स एअरने निमंत्रणाच्या पत्रात अमरावती विमानतळाचे केलेले नामकरण आणि नंतर उद्घाटन कार्यक्रमात दाखविण्यात आलेल्या चित्रफितीत आलेले दुसरे नाव, यातून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) अंग काढून घेतले असले, तरी विमानतळाच्या नामकरणातून राजकारण केले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरावती विमानतळ १९९२ मध्ये उभारण्यात आले. गेली तीन दशके या विमानतळाला अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी वापरले जाणारे विमानतळ अशीच ओळख होती. आता अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू झाली आणि अमरावतीकरांचे एक स्वप्न साकारले गेले. पण, विमानतळाचे लोकार्पण होण्याआधीच विमानाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेत आला होता.
अमरावती विमानतळाला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव द्यावे, ही जुनी मागणी आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. पण, त्याचवेळी विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समोर आली. त्यामुळे दोन उभे गट पडले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाला पसंती दर्शविणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचा ‘शिवपरिवारा’चा दावा आहे.
समाजमाध्यमांवर याविषयी सार्वमत घेण्यात आले, त्यातही ७१.६ टक्के लोकांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे, असे मत नोंदविले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे पापळ हे जन्मगाव विमानतळापासून जवळच आहे. त्यांचे शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव दिल्यास एका शेतकरी नेत्याचा तो खऱ्या अर्थाने सन्मान ठरेल, असे ‘शिवपरिवारा’चे म्हणणे आहे. दुसरीकडे, भाजपशी संबंधित असलेल्या गटाकडून विमानतळाला संत गुलाबराव महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रेटण्यात येत असल्याने नामकरणाच्या मुद्यावर संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या आमदारांनी मात्र या विषयावर सूचक मौन बाळगले आहे.
संत गुलाबराव महाराज कोण होते?
संत गुलाबराव महाराज हे दृष्टीहीन होते. तरीही ३४ वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी योग, उपनिषद, ब्रम्हसूत्र, ध्यान, शास्त्र अशा विविध विषयांवर १३० ग्रंथ लिहिले. त्यांना प्रज्ञाचक्षू म्हटले गेले. त्यांचा जन्म विमानतळापासून जवळच असलेल्या लोणी टाकळी या त्यांच्या आजोळी झाला होता. त्यामुळे गुलाबराव महाराज यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या भक्तांकडून केली जात आहे.
गोंधळात गोंधळ
विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेत असताना घडलेल्या दोन चुकांमुळे वाद वाढला. अलायन्स एअर कंपनीने निमंत्रण पत्रात डॉ. पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख केल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अखेर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) आक्षेपानंतर अलायन्स एअरने निमंत्रण पत्र मागे घेतले.
त्यातच उद्घाटनप्रसंगी दाखविण्यात आलेल्या चित्रफितीत संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असा उल्लेख आल्याने गोंधळ वाढला. ती संबंधित एजन्सीची चूक असल्याचे स्पष्टीकरण ‘एमएडीसी’ला द्यावे लागले. अजून विमानतळाला नाव मिळालेले नाही, पण त्यावरून राजकारण मात्र पेटत आहे.
आंदोलन उभारणार-खासदार बळवंत वानखडे
गुलाबराव महाराज यांच्याप्रती कुठलीही नाराजी नाही. ते आदरणीय आहेत. परंतु पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीमध्ये विमानतळाला त्यांचे नाव देणे औचित्याचे ठरेल. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे नाव न दिल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे खासदार बळवंत वानखडे यांचे म्हणणे आहे.