कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेतील पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता वाढली आहे. त्याला आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचे संदर्भ आहेत. इचलकरंजीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागल्याने आणि सुळकुड पाणी प्रश्नी निष्क्रीय राहिल्याने विरोधकांनी विशेषतः महाविकास आघाडीने खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे या महायुतीतील नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. पाणी प्रश्नाचा वापर राजकारणासाठी टोळी कार्यरत झाली आहे, असे प्रत्युत्तर आमदार आवाडे यांनी दिले असून यानिमित्ताने पाण्याबरोबरच राजकारणही तापत चालले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इचलकरंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मूळची पंचगंगा नदी, नंतर कृष्णा, मग वारणा कुंभोज, त्यानंतर काळम्मावाडी धरण, पुन्हा वारणा दानोळी आणि अलीकडची सुळकुड अशा योजनांची दशदिशा सुरू आहे. कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून पाणी आणण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे या कागलच्या नेत्यांनी विरोध केला. त्या विरोधात इचलकरंजी महापालिका कार्यक्षेत्रात कृती समितीने पाणी आणण्याचा निर्धार केला आहे.

हेही वाचा – अभिनेते दीपक अधिकारींचा मोठा निर्णय, तीन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा; तृणमूलचा ‘देव’ पुन्हा निवडणूक लढवणार का?

लोकप्रतिनिधींना फटका

या प्रयत्नांना खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची तीव्र भावना व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्याभरात इचलकरंजीची पाणी टंचाईची समस्या. आणि त्याला जोडूनच आलेले लोकसभा – विधानसभा निवणुकीचे राजकारण कारणीभूत ठरले आहे. इचलकरंजीच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने राजू शेट्टी , सुरेश हाळवणकर यांना २०१९ सालच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करायला लागला होता. आता हेच डावपेच खासदार माने, आमदार आवाडे यांच्या बाबत उलटवायला विरोधकांनी सुरुवात केली असल्याने ऐन थंडीत पाणी प्रश्नाला राजकारणाचीही उकळी आली आहे.

आवाडे टीकेचे लक्ष्य

दसऱ्याच्या वेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर सभा घेऊन इचलकरंजीकरांना एक दिवस आड पाणी देणार असा इरादा व्यक्त केला होता. प्रत्यक्षात याची कार्यवाही काही दिवसच झाली. गेले महिनाभर तर पाण्याची तीव्रता वाढत चालली असून भागाभागात लोकआंदोलने होत आहेत. यावरूनच विरोधकांनी, प्रामुख्याने महाविकास आघाडीने खासदार माने, आमदार प्रकाश आवडे यांना घेरायला सुरुवात केली आहे. एक दिवस पाणी देण्याची घोषणा हवेत विरली आहे. कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचे काम अपुरे राहिले असल्याने इचलकरंजीत पाणीबाणी होण्यास आवाडे हेच कारणीभूत आहेत. खासदार माने हे शासनाला पत्र देण्याशिवाय दुसरे काहीच करीत नाहीत. त्यामुळे हे दोघे मते मागण्यासाठी येतील तेव्हा घागरी घेऊन विरोध करावा, असे आवाहन विरोधकांच्या बैठकीमध्ये पाणी बैठकीमध्ये करतानाच आमदार – खासदार विरोधात जनमत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. लगेचच महापालिकेचे उपयुक्त तैमूर मुल्लाणी यांची भेट घेतली. तेव्हाही आमदार आवाडे यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आले.

हेही वाचा – इच्छुकांची भाऊगर्दी; फाटाफुटीतून बळ वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न

विरोधकांवर प्रहार

विरोधकांचे आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी खोडून काढले. ‘कसलेच विधायक काम कधीच न केलेल्या विरोधकांकडून आमच्या योजना हाणून पाडण्यासाठी राजकीय कारस्थान केले जात आहे. एक दिवसआड नागरिकांना पाणी देणार आहे. कृष्णा योजनेसाठी जलवाहिनीचे काम दोन दिवसांत सुरु होईल. सहा जलकुंभ बांधण्याच्या ३१ कोटी ३७ लाखांच्या पाणी पुरवठा प्रकल्पास नगरविकास विभागाकडून मंजुरी दिली आहे. सुळकूड योजनेबाबत राजकारण केले जात आहे. शासन पातळीवर आपला सतत पाठपुरावा सुरू असून त्याबाबतची आवश्यक कार्यवाही सुरू आहे, असे म्हणत आमदार आवाडे यांनी विरोधकांना उत्तर देत पाणीप्रश्नी आपण कसे सक्रिय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.