अविनाश कवठेकर
शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात पाण्यात गेल्यानंतर शहर नेमके कोणामुळे पाण्यात गेले, यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा पूर येण्यास सुरुवात झाली आहे. शहराची झालेली दुरवस्था आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याऐवजी राजकारण रंगल्याचे चित्र आहे. नेतृत्वाबाबत पुणे निराधार असल्यापासून भाजपच्या निष्क्रीय कारभारामुळेच शहराची दुरवस्था झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी केला आहे. तर या सर्व प्रकाराला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच जबाबदार असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. विशेष म्हणजे शासकीय यंत्रणाही जबाबदारी झटकून एकमेकांकडे बोट दाखवत असल्याची वस्तुस्थिती आहे.
अवघ्या सव्वा तासात झालेल्या ६५ मिलीमीटर पावसाने रविवारी पुण्याची दाणादाण उडविली. संपूर्ण शहर पाण्याखाली गेले. शहरातील पूर ओसरल्यानंतर आता राजकीय पुराला उधाण आल्याचे दिसून येत आहे. शहर कोणामुळे पाण्याखाली गेले, त्याला कोण जबाबदार यावरून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि आम आदमी पक्षाने एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत बोट आणून ‘बोट दाखवा, बोट थांबवा’ अशा घोषणा देत भाजपविरोधात उपरोधिक आंदोलन करत भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न आहे. शहराच्या या परिस्थितीला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली असून शिवसेनेकडूनही यासंदर्भात आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता असताना त्यांना शहराचे नियोजन करता आले नाही. गेल्या पाच वर्षात नियोजनाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. भाजप नेत्यांनी हे शहर बकाल करून खुद्द पंतप्रधानांना खोटे पाडले आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या शब्दाचाही मान त्यांना ठेवता आला नाही, अशा शब्दात राष्ट्रावदी काँग्रेसने भाजपवर हल्ला चढविला.
बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाले वळविले. त्याचा फटका नागरिकांना बसला. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांवर आरोप करत असले तरी या दोघांच्याही काळात आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ओढे नाले बुजविले गेले. २०१९ मध्ये आलेल्या पुरानंतर कोणीही बोध घेतला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच या सर्व प्रकाराला जबाबदार आहेत, अशी टीका आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपनेही त्याबाबत पलटवार केला आहे. आंदोलन करून दिशाभूल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिकेत आणून बसविलेल्या प्रशासकाने नालेसफाईची कामे व्यवस्थित केली नाहीत. पावसाळा पूर्व कामात सफाईत भ्रष्टाचार झाला. पाच वर्ष वगळता अनेक वर्ष महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी नियोजन न करता विकास केला. त्यांचे हे पाप आहे, असा प्रतिहल्ला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.