देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला असला, तरी सत्तासंघर्ष येथेच थांबलेला नाही. रविवारी (३ डिसेंबर) चारही राज्यांचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार, कुणाला मंत्रिपद मिळणार यासाठीची राजकीय चुरस निर्माण झाली आहे. विरोधकांशी दोन हात करणारे आता पक्षातच विरोधी गटाशी दोन हात करताना दिसत आहेत. त्यामुळे या चारही राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार, कुणाला मंत्रिपद मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.
तेलंगणा
तेलंगणात काँग्रेसला विजय मिळाला आहे. काँग्रेसने पक्षाचा निरीक्षक म्हणून तेलंगणात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नियुक्त केलं आहे. शिवकुमार यांनी सोमवारी (४ डिसेंबर) काँग्रेसचे तेलंगणातील नेते एकत्र बसून चर्चेनंतर निर्णय घेतील असं कळवलं आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तेलंगणाचे राज्यपाल सुंदरराजन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावाही केला आहे.
तेलंगणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहेत. मात्र, निकालानंतर इतर कुणी नवा दावेदार तयार होतोय का यावर पुढील राजकीय गणितं ठरणार आहेत. भूतकाळात कामाटीरेड्डी राजगोपाल रेड्डी आणि डॉ. दसोजू श्रवण यांनी रेवंत रेड्डी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर पक्ष सोडण्याचा निर्णयही घेतलेला आहे. रेवंत रेड्डी यांच्यावर एककल्लीपणे काम करण्याचा आरोपही होतो. तसेच अभाविप आणि टीडीपीतून काँग्रेसमध्ये आल्याने ते पक्षाच्या बाहेरचे असल्याचा मुद्दाही वारंवार उपस्थित करत टीका होत असते.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव करत भाजपा पुन्हा सत्तेत आली. यानंतर तेथे पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता आहे. अद्याप भाजपाने कोणतंही अधिकृत नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे सध्या छत्तीसगडमध्ये एकूण आठ नावं चर्चेत आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री रमण सिंह, केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, भाजपा प्रदेशाध्यक्ष अरुण साओ हे आघाडीवर आहेत.
राजस्थान
राजस्थानमध्येही भाजपाने सत्तेत पुनरागमन केलं आहे. येथे भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून वसंधुरा राजे याची दावेदारी मोठी आहे. मात्र, राजस्थानमध्ये भाजपाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे आता याबाबत अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. वसुंधरा राजे यांना निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं अशी वसुंधरा समर्थकांची मागणी होती. मात्र, पक्षाने ती मागणी मान्य केली नाही. विशेष म्हणजे वसुंधरा राजे आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठी यांचं नातं तितकं सौहार्दपूर्ण असल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळाल्याने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावर भाजपाचे वरिष्ठ काय निर्णय घेतात यावरच हे अवलंबून असेल.
मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये दोन दशकांपासून भाजपा सत्तेत आहे. त्यामुळे सत्ताविरोधी भावनेचा फटका पक्षाला बसू नये म्हणून भाजपाने प्रचारात शिवराज सिंह यांना काहीसं दूर ठेवलं. पोस्टर आणि बॅनर्सवर केंद्रीय नेत्यांचे चेहरे प्रामुख्याने पाहायला मिळाले. मात्र, त्या तुलनेत शिवराज सिंह यांचा चेहरा भाजपाने पुढे आणला नाही. मात्र, प्रचाराच्या मैदानात शिवराज सिंह यांनी दिवसाला १६ तास सक्रिय राहत १० रॅली करून प्रचाराचा धुराळा उडवला.
हेही वाचा : काँग्रेस तीन राज्यांत पिछाडीवर, लोकसभा निवडणुकीचे गणित बदलणार? ‘आप’ नेत्याच्या विधानामुळे चर्चेला उधाण!
विशेष म्हणजे शिवराज सिंह यांचा स्वतःचा दणदणीत विजय झाला. त्यांना १ लाख ५ हजारचं मताधिक्य आहे. या निकालात शिवराज सिंह यांच्या योजनांची जोरदार चर्चा राहिली. त्यांची लोकप्रियता कायम राहिल्याचं दिसलं आहे. त्यामुळेच त्यांना आता पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदावर संधी मिळू शकते. मात्र, दुसरीकडे भाजपाने मध्य प्रदेशात अनेक केंद्रीय मंत्र्यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाला संधी देऊन नवी सुरुवात करण्याचीही शक्यता कायम आहे.