मोहन अटाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेला आमदारद्वय बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद संपल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या मेळाव्यात जाहीर करण्यात आले असले, तरी मेळाव्यातून झालेली मंत्रिपदाची मागणी पाहता सत्तेत राहूनही सरकारवर दबावगट निर्माण करण्याचे बच्चू कडूंचे प्रयत्न राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

सत्तेत सहभागी होण्यासाठी बच्चू कडूंनी गुवाहाटी येथे पैसे घेतल्याचा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर देताना दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर समेट घडवण्यात यश मिळाले. बच्चू कडूंनी प्रहारच्या मेळाव्यात शक्तीप्रदर्शन करतानाच हा वाद संपल्याचे जाहीर केले. पण, रवी राणांसह इतर विरोधकांना पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नका, असा गर्भित इशारा बच्चू कडूंनी दिला.

हेही वाचा… राहुल बबनराव लोणीकर यांच्या ‘सर्वपक्षीय’ सत्काराकडे रावसाहेब दानवेंसह भाजप नेत्यांचीही पाठ

सत्तारूढ आघाडीतील दोन आमदारांचा ‘खोक्यांवरून’ झालेला वाद सरकारसाठी परीक्षेचा ठरला होता. बच्चू कडू यांनी आपण प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांनी सरकारसोबत राहण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू राज्यमंत्री होते, सत्तांतरानंतर लगेच त्यांना मंत्रिपद मिळेल, ही कार्यकर्त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नव्हती. प्रहारच्या मेळाव्याच्या माध्यमातून ही मागणी पुढे रेटण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. सोबतच सरकारकडून शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांच्या काही मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी दबावगट निर्माण करण्याचे सुतोवाच बच्चू कडू यांनी केले.

हेही वाचा… भारत जोडोयात्रेनिमित्त कोल्हापुरात अन्य पक्षांचीही मोट बांधण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आरोपांमुळे बच्चू कडू यांच्या प्रतिमेला धक्का पोहचल्याची खंत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील लढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. एका कार्यकर्त्यावर जेव्हा खोटे आरोप होतात, तेव्हा दु:ख होते, अशा भावना व्यक्त केल्या. प्रहारच्या मेळाव्याचा वापर ‘डॅमेज कंट्रोल’ची संधी म्हणून करण्यात आल्याचे दिसून आले.

हेही वाचा… ‘भारत जोडो यात्रे’त श्रीजया अशोक चव्हाण राजकीय पदार्पण करणार?

सरकारसोबत राहून विकासाचे राजकारण करण्याची भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली असली, तरी प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार संपूर्ण राज्यात करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. आगामी जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी सरकारमधील इतर घटक पक्षांची काय भूमिका असेल, याची चर्चा आता सुरू झाली आहे. आपण आपले शब्द मागे घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. रवी राणा आणि आपण स्वत: जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करू, असेही त्यांनी‍ स्पष्ट केले आहे, पण या मैत्रीपर्वासाठी प्रतीक्षा करावी लागेल, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics of pressure by bacchu kadu for minister post through public rally print politics news asj