नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक आणि काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदासाठी आग्रही असलेल्या विदर्भातील पक्षातील दोन मोठ्या नेत्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी धक्का देत आतापर्यंत चर्चेत नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली. ही बाब पक्षात वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या मात्तबर नेत्यांना योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी उत्तम राहिल्याने पक्षातील जुन्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला होता. परंतु त्यानंतर विविध राज्यातील निवडणुकांमध्ये झालेली पडझड विशेषत: महाराष्ट्रातील दारुण पराभव श्रेष्ठींच्या जिव्हारी लागला. पक्षाची धुळधाण झाल्याचे चित्र संघटनेतून दिसू लागले. पण, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या पराभवाने खचले नाहीत. त्यांनी भविष्यातील काँग्रेस डोळ्यासमोर ठेवून संघटनेत त्यांना अनुकूल बदल करण्यास प्राधान्य दिले. युवकांना काँग्रेसची विचाराधारा समजण्यासाठी प्रशिक्षणावर भर तर काही वर्षापासून दिला जात आहेच. पण, संघटनेतही हळूहळू त्यांना स्थान देणे सुरू केले. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नियुक्तीमध्ये याच धोरणाची झलक दिसून आली आहे. पक्ष मजबूत करणे आणि पक्ष चालवणे या दोन गोष्टींचा समोतल साधण्याचा प्रयत्न नव्या नियुक्त्यांच्या माध्यमातून केला गेला, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

पटोले, वडेट्टींवारांना योग्य संदेश

काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदासाठी इच्छुक होते. तर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रदेशाध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी म्हणून दिल्लीपर्यंत मोर्चबांधणी करीत होते. महाराष्ट्रात पक्षाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर लगेचच वडेट्टीवार यांनी तर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष पटोले यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करणे सुरू केले होते. विधानसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसची कामगिरी तुलनेने बऱ्यापैकी आहे, त्यामुळे विदर्भालाच प्रदेशाध्यक्षपद मिळावे यासाठी ते आग्रही होते. तर काँग्रेसचे महाराष्ट्रातील काही नेते त्यांना प्रदेशाध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू लागले होते. हेच नेते वडेट्टीवारांची भाजपशी त्यांच्या जवळीकीचे किस्से दिल्ली दरबारी पोहोचवत होते. पण, वडेट्टीवार यांनी इतर बहुजन कल्याण मंत्री असताना आणि विरोधी पक्षनेता असताना दिल्लीतील काही नेत्यांना आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले होते. ही बाब त्यांच्या कामी आली. सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्याने वडेट्टीवारांना प्रदेशाध्यक्षपदापासून रोखण्यात यश आल्याचे समाधान त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मिळाले. पण, विधिमंडळ पक्षनेतेपद पदारात पाडून घेण्यात वडेट्टीवार यशस्वी झाले.

महाराष्ट्रातील पराभवानंतर पटोले यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाब वाढला होता. तर ते पद वाचवण्याच्या प्रयत्नात होते. पण त्यांना हा दबाब फार काळ थोपवून धरता आला नाही. त्यांना शेवटी त्यांना पक्षाने नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करावा, अशी भूमिका घेणे भाग पडले. हे करीत असताना त्यांनी विधिमंडळ पक्षनेतेपद आपल्याकडे राहील, यासाठी दिल्लीत प्रयत्न केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही. एकूणच विदर्भातील या दोन मोठ्या नेत्यांचा महाराष्ट्र काँग्रेसवर पकड निर्माण करण्यासाठीच्या छुप्या लढाईत तूर्त तरी वडेट्टीवार यांची सरशी झाली आहे, असे दिसून येते.

Story img Loader