सोलापूर : कांद्यामुळे राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह शेजारच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. तर करमाळा कृषिउत्पन्न बाजार समितीची मुदतही ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने यापूर्वीच दिले आहेत. यापैकी सोलापूर आणि बार्शी कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु सत्ताधारी भाजपच्या ताब्यात असलेल्या दोन्ही कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्यासाठी पणन खात्याकडे खास वजन वापरून निवडणुका टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपमधील दोन देशमुखांमधील वाद मिटणार की दोघे एकत्र येणार याचीही जिल्ह्याच्या राजकारणात उत्सुकता आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात नवी मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर चौथ्या क्रमांकांची मानली जाते. ५५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बाजार समितीचे सभापतिपदाची धुरा भाजपचे आमदार विजय देशमुख हे वाहात आहेत. आश्चर्य म्हणजे या बाजार समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे बहुमत असूनही सभापतिपद मागील चार वर्षे भाजपचे आमदार विजय देशमुख यांच्याकडे आहे. यामागे महाविकास आघाडीचा सोयीचा राजकीय डाव असल्याचे मानले जाते. आता संचालक मंडळाची मुदत संपत असताना ठरल्याप्रमाणे निवडणूक झाली तर भाजपचे आमदार विजय देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे एकत्र येऊन स्वतंत्र पॕनेल उतरवणार की पूर्वीसारखे दोन्ही देशमुखांमध्येच पुन्हा लढत होणार, हे अद्यापि स्पष्ट झाले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या भूमिकेकडेही सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
हेही वाचा – ‘माधव’च्या प्रयोगाचेच भाजपकडून अनुकरण
मागील २०१८ साली झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तत्कालीन सहकार व पणनमंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रस्थापित दोन्ही काँग्रेसच्या विरोधात स्वतःचे पॅनेल उभे केले होते. तेव्हा दोन्ही काँग्रेसच्या मदतीला तत्कालीन पालकमंत्री विजय देशमुख धावून आले होते. तेव्हा दोघेही देशमुख भाजपचे मंत्री असतानाही एकमेकांच्या विरोधात उतरल्यामुळे कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडाणुकीत रंग भरला होता. अखेर यात सुभाष देशमुख यांचा विजय देशमुख यांना धडा शिकविण्याचा डाव अयशस्वी झाला आणि महाविकास आघाडीकडेच बाजार समितीचा ताबा कायम राहिला.
तत्पूर्वी, सहकार व पणन हे दोन्ही खाती सुभाष देशमुख यांच्याकडे असताना त्यांनी आपल्याच विधानसभा मतदारसंघाशी निगडीत असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची चौकशी लावली होती. त्यातून तत्कालीन संचालक मंडळावर गैरकारभार करून संस्थेचे हित धोक्यात आणल्याचा ठपका ठेवून फौजदारी गुन्हेही दाखल झाले होते. संचालक मंडळही बरखास्त झाले होते. तेव्हा अडचणीत सापडलेल्या दोन्ही काँग्रेसच्या प्रस्थापित मंडळींनी सुभाष देशमुख यांना शह देण्यासाठी विजय देशमुख यांचा धावा केला होता. पुढे प्रस्थापितांवरचे संकट टळले आणि नंतर झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पुन्हा बहुमत मिळाले तरी दोन्ही काँग्रेससाठी विजय देशमुख हेच तारणहार बनले होते. दरम्यान, पुढे आमदार सुभाष देशमुख यांचे राजकीय विरोधक, माजी आमदार दिलीप माने हे कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले खरे; परंतु शासनाकडून संरक्षण मिळण्याची प्रस्थापित सत्ताधारी महाविकास आघाडीने आमदार विजय देशमुख यांच्याकडे कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद सोपविले. गेली चार वर्षे हे आमदार विजय देशमुख हेच सभापती आहेत. दुसरीकडे भाजपच्या दोन्ही देशमुखांमधील संघर्ष अजूनही संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक होण्यासाठी आमदार सुभाष देशमुख हे शासन दरबारी हालचाली करीत असून त्यांना पक्षाचे वजनदार जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची साथ लाभत आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन्ही देशमुख एकत्र येतील का, याविषयी सार्वत्रिक उत्सुकता आहे.
हेही वाचा – राज ठाकरे यांच्याकडून जुने हिशेब चुकते
तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार विजय देशमुख यांना वगळून पॅनेल तयार झाल्यास तेव्हा मात्र त्यांना भाजपचे स्वतंत्र पॅनेल तयार करणे अपरिहार्य ठरणार आहे. भाजपचे म्हणून तयार होणाऱ्या स्वतंत्र पॕनेलमध्ये दोन्ही देशमुखांना एकत्र यावे लागणार आहे. तसे संकेत आमदार विजय देशमुख यांनी दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार विजय देशमुख यांना भाजपसह त्यांच्या वीरशैव लिंगायत समाजातूनही घेरले जात आहे. सोलापूर विमानसेवेच्या प्रश्नावर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी पाडून टाकण्याचा मुद्दा लिंगायत समाजाच्या दृष्टीने संवेदनशील ठरत आहे. यात आमदार विजय देशमुख विरुद्ध सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.
कृषिउत्पन्न बाजार समितीवरही वर्षानुवर्षे लिंगायत समाजाचे वर्चस्व राहिले आहे. आमदार विजय देशमुख हे डोईजड ठरू लागल्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत लक्ष घालायचे ठरविले आहे. त्यामुळे या कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने जिल्हा उपनिबंधक (सहकार) कार्यालयातून हालचाली होत असताना दुसरीकडे त्या अनुषंगाने राजकीय पातळीवरही घडामोडी घडत आहेत.