हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यात येऊ घातलेला बल्क ड्रग पार्क प्रकल्पही राज्याबाहेर जाण्याची शक्यता असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुळात या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्थानिकांचा विरोध आहे. भाजपने सुरुवातीपासूनच त्यांच्या सुरात सूर मिसळवला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या आरोपात तथ्य असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र शासनाच्या रसायन व खते मंत्रालयाच्या २ जून २० च्या अधिसूचनेनुसार औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्याने विकसित करण्याकरता प्रोत्साहन देण्यासंदर्भातील योजनेनुसार रोहा व मुरुड तालुक्यातील १७ गावांमधील एकूण १ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रावर औषध निर्माण उद्यानाची स्थापना करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळामार्फत सिडकोला हे क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार सिडकोने हे क्षेत्र विनाअधिसूचित केले.
हेही वाचा…आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यामुळे शिवसेनेची बालेकिल्ल्यातील पडझड थांबणार?
या पूर्वी याच परिसरात देवेंद्र फडणवीस सरकारने एकात्मिक औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कुंडलिका नदीच्या किनारपट्टीवरील अलिबाग, रोहा, मुरुड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांधील ४० गावांमधील १९ हजार १४६ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार होती. सिडकोची या परिसरात विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. रोहा तालुक्यातील २१, अलिबाग तालुक्यातील ९, मुरुड तालुक्यातील १० आणि श्रीवर्धन तालुक्यातील १ अशा एकूण ४० गावांचा यात समावेश असणार होता. मात्र महाआघाडी सरकारने हा प्रकल्प रद्द केला असून त्या ऐवजी औषध निर्मिती उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा…. दिल्लीतील बदल पुण्यातही करण्याचा ‘आप’ला विश्वास
यानंतर भाजपने स्थानिकांचा बल्क ड्रग पार्कला विरोध असल्याचे सांगत शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली होती. प्रकल्पा विरोधात आजवर झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभागही घेतला होता. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. केंद्र सरकारची प्रकल्पाला मंजूरी मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आग्रही आहेत. तशी पत्रेही त्यांनी केंद्र सरकारला या पूर्वी दिली आहेत. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी या प्रकल्पाला केंद्राकडून मंजूरी मिळणार नाही याची दक्षता घेतली होती.
हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर
आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर हा प्रकल्पही मागे पडणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आरोपांमधून याचीच प्रचिती मिळते आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
काय आहे हा प्रकल्प?
उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत देशात चार मोठे बल्क पार्क उभारण्यात येणार आहेत. यातील एक प्रकल्प महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली होती. यासाठी मुरूड आणि रोहा तालुक्यातील १७ गावातील जागा संपादीत केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून प्रकल्पामुळे ७५ हजार रोजगार निर्मिती होईल आणि हा औषध निर्मिती प्रकल्प प्रदूषण विरहीत असेल असा दावा उद्योग मंत्रालयाने केलेल्या सादरीकरणात करण्यात आला आहे.
दुसरा प्रकल्पही राज्याबाहेर जाणार
वेदान्त फॉसकॉन पाठोपाठ रायगड जिल्ह्यातील बल्क ड्रग पार्कही राज्याबाहेर नेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. केंद्र सरकारच्या दबावामुळे दुसरा मोठा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. — आदित्य ठाकरे, शिवसेना नेते
हा जनभावनेचा आदरच
मुळात हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात येण्याची सुतराम शक्यता नव्हती. एखादा प्रकल्प यायचा असेल तर तेथील लोकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि किमान पायाभूत सुविधा सुविधा आवश्यक असतात. पण या दोन्ही गोष्टी इथे नव्हत्या. प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध आहे. त्यांनी वेळोवेळी तो दाखवून दिला. महाविकास आघाडीने केलेले भूसंपादन आणि जनसुनावणीचे प्रयत्न लोकांनी उधळून लावले. भाजपच्या वतीने स्थानिकांच्या या लढ्याचे नेतृत्व मी केले. त्यामुळे हा प्रकल्प रायगडात होत नसेल तर हा जनभावनेचा आदरच म्हणावा लागेल. – महेश मोहिते. माजी जिल्हाध्यक्ष भाजपा.