पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये नवीन शहराध्यक्ष निवडीवरुन तीन गट पडले आहेत. एक गटाने विद्यमान शहराध्यक्ष शंकर जगताप यांनाच कायम ठेवण्याची मागणी पुढे केली. तर, एका गटाची कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची मागणी आहे. अन्य एका गटाने संघटनेचा अनुभव, निष्ठावान कार्यकर्त्यांलाच शहराध्यक्षपद द्यावे अशी भूमिका घेतली आहे. त्यातूनच दोन शहराध्यक्ष निवडण्याची पुढे आलेली चर्चा सध्या तरी थांबली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व भाजपने मोडून काढले. राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिका २०१७ मध्ये भाजपने जिंकली. तत्कालीन शहराध्यक्ष, आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक जिंकली होती. महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी महापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात असलेले आझम पानसरे यांचीही महत्वाची भूमिका होती. आता शहरातील प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) राज्यातील सत्तेत सोबत आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांचे पुन्हा शहर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत पवार यांच्या आव्हानाला सामोरे जाणारा तगडा शहराध्यक्ष नियुक्त करण्यासाठी भाजपमध्ये हाचलाची सुरू आहेत. भाजपचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदाराकडेच शहराध्यक्षपद असावे, अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार लक्ष्मण जगताप यांच्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणून आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान लांडगे यांच्यासमोर होते. परंतु, करोना महामारी, ओबीसी आरक्षणामुळे महापालिका निवडणुका रखडल्या. आमदार लांडगे यांची नेतृत्व सिद्ध करण्याची संधी गेली.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतील उमेदवारीवरुन जगताप कुटुंबातच कलह झाला होता. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिल्यानंतर शंकर जगताप यांना शहराध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर केली. पुढे २०२४ च्या निवडणुकीत शंकर जगताप चिंचवडचे आमदार झाले. या निवडणुकीदरम्यान भाजपचा एक गट नाराज झाला होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शत्रुघ्न काटे यांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले. आता पुन्हा शहराध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांच्याकडेच शहराध्यक्षपद कायम ठेवावे किंवा संघटनेचा अनुभव असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांला शहराध्यक्षपद द्यावे अशी भूमिका काही पदाधिका-यांची आहे. तर, कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्याची एका गटाची मागणी आहे. त्यामुळे आगामी काळात शहराध्यक्ष निवडीवरुन भाजपमधील अंतर्गत राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आजी-माजी शहराध्यक्षांमध्ये धुसफूस
विद्यमान शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि माजी शहराध्यक्ष, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यातील धुसफूसही वारंवार उघड होऊ लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लांडगे यांनी चिंचवड मतदारसंघातील तर जगताप यांनी भोसरी मतदारसंघातील प्रश्न विचारण्यावर भर दिला. जाहीर कार्यक्रम, पक्षाच्या वतीने करण्यात येणा-या जाहिरातबाजीत एकमेकांचे छायाचित्र टाकण्याचे टाळले जाते. पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त आमदार महेश लांडगे यांनी लावलेल्या फलकांवर शहराध्यक्ष जगताप यांचे छायाचित्र टाकणे टाळले. केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांचेच छायाचित्र फलकांवर होते.
याबाबत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, ‘पक्षात संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्यानंतर शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होईल. एकच शहराध्यक्ष निवडला जाईल. पक्षात कोणतीही गटबाजी, कलह नाही’.