आम आदमी पक्षाने शुक्रवारी हरियाणामधील सर्व दहा लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी नेमले आहेत. शेजारी असलेल्या पंजाब राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पंजाबप्रमाणेच हरियाणातही पक्षाचा विस्तार करण्यासाठी सर्वच्या सर्व ९० विधानसभा मतदारसंघामध्येही पंजाबमधील नेत्यांची प्रभारीपदी नियुक्ती केली. हे प्रभारी पंजाबमधील महत्त्वाचे नेते असून काही मंडळी सरकारमधील आहेत, तर ७० जण विविध महामंडळे आणि महापालिकांचे अध्यक्ष आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, तर त्याच वर्षी ऑक्टोब महिन्यात हरियाणा विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सध्या आम आदमी पक्षाने काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीत सहभाग झाला असला तरी हरियाणामधील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा >> ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही’, ‘आप’च्या संजय सिंह यांच्या अटकेनंतर काँग्रेसची भूमिका

पंजाबचे कॅबिनेट मंत्री हरपाल सिंग चिमा यांना सोनिपत, बालजिंदर कौर यांना हिसार, चेतन सिंग यांना कुरुक्षेत्र, हरभजन सिंग यांना कर्नाल, कुलदीप सिंग धालीवाल यांना रोहतक, अनमोल गगन मान यांना अंबाला, ब्राम शंकर जिम्पा यांना फरिदाबाद, लालजीत सिंग भुल्लर यांना भिवानी महेंद्रगड, लाल चंद यांना गुरुग्राम आणि बलकर सिंग यांना सिरसा लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘आप’ हरियाणाचे उपाध्यक्ष अनुराग ढांडा यांनी एक्स (जुने ट्विटर) वर पोस्ट टाकून म्हटले, “हरियाणा लोकसभेसाठी नेमलेल्या सर्व प्रभारींचे मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या सहकार्याने आपण सर्वजन हरियाणाच्या प्रचाराची धडाक्यात सुरुवात करुया.”

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ढांडा म्हणाले, “पंजाबमध्ये ज्यांनी पक्षासाठी अतिशय उत्तम काम केले आहे, अशाच नेत्यांची नियुक्ती हरियाणामध्ये मतदारसंघाचे प्रभारी म्हणून केलेली आहे. या रणनीतीमुळे हरियाणामधील लोकांनाही समजेल की, छोट्या छोट्या कुटुंबातून आलेल्या लोकांनाही पक्षाने मंत्रीपदासारखी मोठी जबाबदारी दिली आहे. यातून कार्यकर्त्यांनाही कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळेल.”

हे वाचा >> पंजाबमध्ये आप-काँग्रेस यांच्यात संघर्ष, अरविंद केजरीवाल यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले ‘आम्ही इंडिया आघाडीत…’

हरियाणाच्या सीमेलगत असलेल्या पंजाब आणि दिल्लीत ‘आप’चे सरकार आहे. तरीही हरियाणामध्ये पक्षाचे फार काही वजन तयार झालेले नाही. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निमित्त साधून पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे हरियाणामध्ये पक्षाचा पाया विस्तारण्याची योजना आखत आहेत. “मंत्र्यांची मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक परिणाम मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. तसेच पंजाबमध्ये आप सरकारने केलेली कामे हरियाणातील जनतेला सांगता येऊ शकतात”, अशी प्रतिक्रिया ढांडा यांनी दिली.

हरियाणामध्ये इंडिया आघाडीतील पक्षांशी आघाडी करण्याबाबतच्या निर्णयाबाबत विचारले असता ढांडा म्हणाले की, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. पंधरा दिवसांपूर्वीच ढांडा यांनी माध्यमांशी संवाद साधताना हरियाणामधील २०२४ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्यात येतील, अशी भूमिका मांडली होती. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबतही अद्याप इंडिया आघाडीमध्ये कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poll battle in haryana meet aaps new look lok sabha team from punjab kvg
Show comments