मुंबई: राज्याच्या शहरी भागातील कमी मतदान हा निवडणूक आयोगासाठी चिंतेचा विषय ठरत असून विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठी गृहनिर्माण संकुल तसेच झोपडपट्टीत १४०० मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नवीन व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी बुधवारी केले.

राज्यात १५ ऑक्टोबरपर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली आ्हे. १०० वर्षांच्या वरील मतदारांची संख्या ४७ हजार ७१६ आहे. अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठबळ मिळविण्यासाठी भाजपची रणनीति, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साधणार संवाद

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे ६ लाख कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रथमच बँकांच्या धनादेश वटनावळच्या (चेक क्लेअरिंग) धर्तीवर नवी व्यवस्था करण्यात आली आहे.

रखडपट्टी टाळण्यासाठी प्रयत्न

लोकसभा निवडणुकीत मुंबई-ठाण्यात मतदारांना तासनतास रांगेत थांबावे लागले होते. याची दखल घेत विधानसभा निवडणुकीत कमीत कमी वेळेत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी एकावेळी तीन ते चार मतदारांना मतदान केंद्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्राचे विक्रेंद्रीकरण करून यावेळी मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत.