नवी दिल्ली : राज्यात बराच गाजावाजा होत असलेल्या महायुतीच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला काँग्रेसकडून ‘महालक्ष्मी योजने’तून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दोन हजार रुपये दिले जाणार असून सुमारे ६० हजार कोटींचा निधी अपेक्षित आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये या योजनेचा समावेश केला जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सोमवारी दिल्लीत राज्यातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. यामध्ये जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. आरोग्य, बेरोजगारी, शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांना सामावून घेणारे मुद्दे जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर ‘महालक्ष्मी योजने’चाही समावेश असल्याचे समजते. ‘लाडकी बहीण’मध्ये लाभार्थींना दरमहा दीड हजार रुपये दिले जात असताना काँग्रेसच्या योजनेत ही रक्कम पाचशे रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. या योजनेबाबत खरगेंनी राज्यातील जाहीर सभांमध्ये यापूर्वीच सूतोवाच केले आहे. याखेरीज ‘कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजने’मध्ये शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते. ही कर्जमाफी सुमारे २८ हजार कोटींची असेल.

हेही वाचा >>>Maharashtra elections 2024 : अमरावती : विधानसभा निवडणूक! भाजपची पाच जागांवर अडचण…

‘स्त्री सन्मान योजने’अंतर्गत महिलांसाठी मोफत बसप्रवास, आरोग्य विमा योजनेंतर्गत कुटुंबातील सदस्यांसाठी २५ लाखांचे विमाकवच अशा योजनांचा समावेशही जाहीरनाम्यात असू शकेल. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने आरोग्य विमा योजना लागू केली होती व त्याचा समावेश लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या जाहीरनाम्यातही करण्यात आला होता. सुमारे ६.५ लाख बेरोजगार युवकांना चार हजार रुपयांचा भत्ता देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यामधून दिले जाऊ शकेल. सामाजिक क्षेत्रासाठी दलित,अल्पसंख्याकांसाठी विशेष योजनांचा जाहीरनाम्यात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. याचा सुमारे ८.५ लाख कोटी नागरिकांना लाभ मिळू शकतो. यावर अंतिम निर्णय काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व घेईल, असे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर जागावाटप व जाहीरनामा जनतेसमोर ठेवला जाणार आहे.