Ballot Paper Vote Count लोकसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. काही तासांतच निकाल स्पष्ट होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासूनच टपाली मतपत्रिकांद्वारे (पोस्टल बॅलेट) प्राप्त झालेल्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत टपाली मतपत्रिकांनी आठ राज्यांमधील नऊ मतदारसंघांतील निकालामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. या नऊ मतदारसंघांमध्ये टपाली मतपत्रिकांची एकूण संख्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती.
कोणत्या मतदारसंघात टपाली मतपत्रिका निर्णायक ठरल्या?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण दर्शविते की, या नऊ जागा अशा १४ मतदारसंघांपैकी होत्या, जिथे विजयाचे अंतर पाच हजार मतांपेक्षा कमी होते. पूर्व उत्तर प्रदेशमधील मच्छलीशहर जागेवर सर्वांत अटीतटीची लढत झाली होती. या जागेवर भाजपा उमेदवाराने बसपच्या उमेदवाराचा १८१ जागांच्या मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्या जागेवर टपाली मतपत्रिकांची एकूण संख्या २,८१४ इतकी होती. २०१९ मध्ये बसपने समाजवादी पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढवली होती.
हेही वाचा : निकालाच्या एक दिवस आधी नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींची भेट का घेतली?
पश्चिम बंगालच्या आरामबागमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपा उमेदवाराचा ११४२ मतांच्या फरकाने पराभव केला होता. या जागेवर २०१९ मध्ये टपाली मतपत्रिकांची एकूण मोजणी १५४९ झाली. भाजपाने झारखंडमधील खुंटी मतदारसंघात विजय मिळवीत काँग्रेसच्या उमेदवाराचा १४४५ मतांनी पराभव केला होता. मागील लोकसभा निवडणुकीत खुंटी येथे टपाली मतपत्रिकांची मोजणी तब्बल १९५१ इतकी झाली होती.
त्याचप्रमाणे बिहारमधील जेहानाबाद जागेवर भाजपाचा मित्रपक्ष जनता दल (युनायटेड)ने राष्ट्रीय जनता दलाचा १७५१ मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात टपाली मतपत्रिकांची मोजणी एकूण ५,०९१ इतकी झाली. कर्नाटकातील चामराजनगर मतदारसंघात भाजपाने १८१७ मतांनी काँग्रेसचा पराभव केला. या जागेवर टपाली मतपत्रिकांची मोजणीतील संख्या तब्बल २,९४३ झाली.
तमिळनाडूच्या चिदंबरममध्ये विदुथलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके) पक्षाच्या उमेदवाराने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या उमेदवाराचा ३,२१९ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात टपाली मतपत्रिकांची एकूण संख्या ३,८०७ होती. ओडिशात काँग्रेसने बीजेडी उमेदवाराचा ३,६१३ मतांनी पराभव करून कोरापुट जागा जिंकली. कोरापुट मतदारसंघात एकूण ३,७८९ टपाली मतपत्रिका होत्या.
हेही वाचा : भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?
आंध्र प्रदेशातील गुंटूर व विशाखापट्टणम या दोन जागांवर विजयाच्या फरकापेक्षा जास्त टपाली मतपत्रिकांच्या मतांची नोंद करण्यात आली होती. गुंटूरमध्ये टीडीपीने वायएसआरसीपीचा ४,२०५ मतांच्या फरकाने पराभव करीत विजय मिळविला; जिथे एकूण ५,२६४ टपाली मतपत्रिकांद्वारे मतदान झाले होते. विशाखापट्टणममध्ये वायएसआरसीपीने टीडीपीचा ४,४१४ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात टपाली मतपत्रिकांची एकूण संख्या ६,२७८ इतकी होती.