मधु कांबळे
मुंबई : महाराष्ट्रात रिपब्लिकन किंवा आंबेडकरी राजकारणात तीस-चाळीस वर्षानंतरही आपले मजबुत अस्तित्व टिकवून ठेवणारे दोनच नेते आहेत, एक अॅड. प्रकाश आंबेडकर आणि दुसरे रामदास आठवले. दोघेही गर्दी खेचणारे आणि जनाधार असलेले नेते आहेत, हे अलिकडच्याच मुंबईतील शिवाजी पार्क आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील दोन्ही नेत्यांच्या स्वंतत्र विराट सभांनी दाखवून दिले आहे.
लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. तसे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणमैदानात उतरण्याची तयारी करु लागले आहेत. अशा तयारीचा प्राथमिक टप्पा म्हणजे बैठका, मेळावे, सभा घेऊन आपापल्या कार्यकर्ते नावाच्या सैन्यांना पहिल्यांदा राजकीय लढाईसाठी सज्ज करणे. अलीकडच्या दहा, वीस वर्षांतील निवडणुका तशा सोप्या राहिल्या नाहीत, निकराची लढाई म्हणूनच त्या लढल्या जातात. त्यासाठी सत्ताधारी असो कि विरोधी पक्ष असो, गाफिल राहण्याची कोणीच चूक करत नाही. प्रत्येकजण आधी आपापली आपल्या मैदानात ताकद अजमावण्याचा प्रयत्न करतो. अलिकडेच आंबेडकरी राजकारणात तसा पहिला प्रयत्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
हेही वाचा… तरुणाईचे मतदान नोंदविण्यासाठी संभाजीनगरमध्ये भाजपचा पुढाकार
शिवाजी पार्कवर २५ नोव्हेंबर रोजी प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित केलेल्या संविधान सन्मान सभेला तुफान गर्दी झाली. आंबेडकर सध्या भाजप व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विरोधात आक्रमकपणे बोलत आहेत. त्या निमित्त त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महाराष्ट्रात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांची इंडिया आघाडी त्याची किती व कशी दखल घेणार आहे, त्यावर किमान महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
हेही वाचा… सांगली नियोजन मंडळातील नियुक्त्यांवर अजित पवार गटाच्या आक्षेपाने यादी रखडणार ?
रिपब्लिकन राजकारणातील दुसरे वजनदार नेते रामदास आठवले यांनीही आंबेडकरी समाजातील आपले स्थान अजमावण्यासाठी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले. आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची भाजपबरोबर युती आहे व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये ते सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. त्यांनी १६ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्म परिषद घेतली. या परिषदेला जागतिक बौद्ध धर्म गुरु दलाई लामा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना निमंत्रित केले होते. दलाई लामा प्रकृती अस्वास्थ्यामुळे परिषदेला उपस्थितीत राहू शकले नाहीत, परंतु शिंदे, फडणवीस व पवार यांनीही परिषदेकडे पाठ फिरविली. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या परिषदेलाही मोठी गर्दी झाली होती. धम्म परिषदेच्या नावाने तशी ती राजकीय सभाच झाली, मात्र आठवले यांनीही त्या निमित्ताने दोरदार शक्तीप्रदर्शन केले. राज्यभरातून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्यने परिषदेला उपस्थित होते. एकूणच सभेचा बाज प्रस्थापित राजकीय पक्षांची बरोबरी करणारा होता. सभास्थानी जाण्याआधी एका रांगेत उभ्या असलेल्या सुमारे हजाराहून अधिक खासगी बसेस आणि त्यावरील धम्म परिषदेचे फलक लक्ष वेधून घेत होते. इतर खासगी लहान चारचाकी वाहनांची तर मोजदादच नव्हती. रामदास आठवले यांच्या शक्तीप्रदर्शनातून सत्तासमृद्धीचेही दर्शन घडले. सध्या तरी त्यांची राजकीय भूमिका भाजप समर्थनाची आहे, मात्र निवडणुकीत रेसकोर्सवर धम्म परिषदेच्या निमित्ताने एकवटलेली ही लोकशक्ती कोणत्या बाजुने उभी राहणार, हा औत्सुक्याचा प्रश्न आहे, अर्थात त्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.