२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी देशातील सर्व प्रमुख आणि महत्त्वाचे पक्ष कामाला लागले आहेत. ही निवडणूक कशी जिंकायची यासाठी राज्य पातळीवर प्रत्येक पक्षाचे नियोजन सुरू आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून भाजपा, काँग्रेस यासारखे पक्ष महत्त्वाच्या पदावर प्रभावी समजल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक करत आहेत. दरम्यान, या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच गुजरातच्या प्रदेश भाजपात मोठी उलथापालथ झाली आहे. येथे मोठे राजकीय महत्व असणाऱ्या प्रदीपसिंह वाघेला यांनी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.
पक्षाने माझा राजीनामा मागितला
प्रदीपसिंह यांना पक्षाने राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, असे सांगितले जात आहे. आपल्या राजीनाम्याबाबत खुद्द प्रदीपसिंह यांनी तशी माहिती दिली आहे. “मला राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यामुळे मी राजीनामा दिला. माझा राजीनामा घेण्यामागे नेमका कोणता उद्देश आहे, याची मला कल्पना नाही. मात्र कारण कोणतेही असो, मी आज जो काही आहे, तो भाजपा पक्षामुळे आहे. स्वत:चीच लाज वाटावी असे मी काहीही केलेले नाही. मी कोणतीही चूक केलेली नाही,” असे प्रदीपसिंह म्हणाले.
“प्रदीपसिंह हे भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते”
गुजरातच्या प्रदेश भाजपाचे सरचिटणीस रजनी पटेल यांनी प्रदीपसिंह यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रदीपसिंह हे भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी सध्या अनुकूल नाही, असे त्यांनी पक्षाला सांगितले होते. त्यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे,” असे रजनी पटेल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले.
“राजीनाम देण्याचा त्यांनी स्वत:च निर्णय घेतला”
“पक्षांतर्गत काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास पदाधिकारी स्वेच्छेने राजीनामा देऊ शकतात. अशाच प्रकारे प्रदीपसिंह यांनी राजीनामा दिलेला आहे. राजीनामा देण्याचा त्यांचा स्वत:च निर्णय घेतलेला आहे. पक्षाने त्यांचा राजीनामा मान्य केला आहे,” असेही रजनी पटेल यांनी सांगितले.
वाघेला यांना पक्षाच्या कार्यालयात येण्यास मनाई
प्रदीपसिंह वाघेला यांना पक्षाच्या कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. याबाबत विचारले असता रजनी पटेल यांनी मात्र ही बाब खोटी असल्याचे सांगितले. “प्रदीपसिंह हे आजही पक्षाचे नेते होते, उद्याही ते पक्षाचे नेते राहतील. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाच्या कार्यालयात येण्यास परवानगी आहे. सध्या जी चर्चा केली जात आहे, त्यात काहीही तथ्य नाही,” असे रजनी पटेल यांनी सांगितले.
प्रदीपसिंह होते गुजरात दक्षिण विभागाचे प्रभारी
गुजरातमध्ये प्रदेश भाजपाचे एकूण चार सरचिटणीस आहेत. वाघेला यापैकी सर्वाधिक प्रभावशाली नेते आहेत. ते गुजरात दक्षिण विभागाचे प्रभारी होते. गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याविरोधात दक्षिण गुजरातमध्ये कट रचला जात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर प्रदीपसिंह वाघेला यांच्यावर वरील कारवाई करण्यात आलेली आहे.
पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी अटकेची कारवाई
काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या सुरत गुन्हे शाखेने दक्षिण गुजरातमधून भाजपाच्या तीन स्थानिक नेत्यांना अटक केली होती. सी. आर. पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. चोर्यासी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संदीप देसाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली. अशाच एका प्रकरणात गेल्या महिन्यात जितेंद्र शाह यांनादेखील पाटील यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
सरचिटणीसपदाच्या दोन जागा रिक्त
दरम्यान, गुजरातमध्ये पटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदीपसिंह यांच्या रुपात पक्षाच्या दुसऱ्या सरचिटणीसांना आपले पद गमवावे लागले आहे. याआधी भार्गव भट्ट यांनादेखील पदमुक्त करण्यात आले होते. प्रदीपसिंह यांच्या राजीनाम्यानंतर आता गुजरात प्रदेश भाजपात सरचिटणीसपदाच्या दोन जागा रिक्त आहेत.