चंद्रशेखर बोबडे
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची नियुक्ती केलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.उद्योगपती, राजकीय नेते असा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे. त्याचप्रमाणे ते उत्तम क्रीडा संघटकही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्यांची पक्षात आणि पक्षाबाहेरही ओळख आहे. पक्षाचा दिल्लीतील चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. दिल्लीतील राजकीय वर्तुळात उठबस आणि सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध ही त्यामागची कारणे आहेत. पटेल हे विदर्भातील गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे वडील मनहरभाई पटेल उद्योगपती होते. राजकारणातही सक्रिय होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पटेल कुटुंब कांग्रेस विचारांचे. पटेल यांनी कॉंगेसकडून गोंदिया तून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.
हेही वाचा… खदखद जिल्ह्यात, स्फोट मात्र डोंबिवलीत
६५ वर्षीय प्रफुल्ल पटेल कॉंगेसमध्ये असताना त्यांना कट्टर पवार समर्थक म्हणून ओळखले जात होते. पण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी पटेल लगेच राष्ट्रवादीमध्ये गेले नव्हते. त्यावेळी त्यांच्या पवार निष्ठेवर शंका व्यक्त करण्यात आली होती. काही महिन्यांनंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पटेल हे आजवर चार वेळा गोंदिया – भंडारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
हेही वाचा… पंचवीशीत पदार्पण करताना राष्ट्रवादी राज्याच्या सर्व भागांमध्ये विस्तारला नाही
राजकारणासोबतच त्यांना क्रीडा क्षेत्रातील कामाचा अनुभव आहे.ते २००९ ते २०२२ पर्यंत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष होते. पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचवेळी पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केले जाणार अशी चर्चा होती. पक्षांच्या वर्धापन दिनी पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत पटेल याची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली. पटेल यांच्यापुढे आता विदर्भात पक्षाची ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान आहे.