नागपूर : एकीकडे प्रदेश काँग्रेसमध्ये दोन नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठीला हस्तक्षेप करावा लागत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियात एका व्यासपीठावर येत परस्परांवर स्तुतीसुमने उधळल्याने तर्कवितर्क केले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात गोंदियात एका व्यासपीठावर होते. प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त गोंदियात आयोजित कार्यक्रमाला पटेल यांनी फडणवीस यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळली. प्रफुल्ल पटेल म्हणाले “फडणवीस हे एक कुशल, दूरदर्शी आणि गतिमान नेते म्हणून ओळखले जातात. मी देशाचा नागरी उड्डाण मंत्री होतो त्यावेळी मी केलेल्या चांगल्या कामासाठी ते मला एसएमएस पाठवत असत.” देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये उभारण्यात पटेल आणि त्यांचे वडील मनोहर पटेल यांचे योगदान आहे”.
हेही वाचा – पंकजा मुंडे यांची नेमकी भूमिका कोणती ?
राज्याच्या राजकारणात राजकीय विरोधक असणाऱ्या या दोन्ही नेत्यांनी परस्परांचे कौतूक केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच पटेल यांच्या मुंबईतील सदनिकेच्या जप्तीची बातमी आली होती. हे येथे उललेखनीय. गोंदियात पटेल-फडणवीस एका व्यासपीठावर येणे हे आणखी एका दृष्टीने महत्वाचे आहे. भंडारा आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मूळ जिल्हे आहेत. या दोघांनी येथून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. पटोले भाजपमध्ये असताना त्यांनी पटेल यांचा पराभव केला होता. स्थानिक राजकारणात ते परस्परांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पटोले यांना शह देण्यासाठी पटेल यांनी भाजपशी युती केली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस-पटेल एका व्यासपीठावर येणे आणि त्यांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळणे यातून एक वेगळा संदेश महाविकास आघाडीत गेला असून, आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत अस्वस्थता आहे.