मुंबई : विचारवंतांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या ‘वंचित बहुजन आघाडी’च्या भूमिकेला विरोध केल्याप्रकरणी प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार यांना समाजमाध्यमांवर लक्ष्य करण्यात येत आहे. ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांचा स्त्री लेखिका -कार्यकर्तींनी निषेध केला असून तसे पत्रक काढले आहे.

या पत्रावर ८० लेखिका- कार्यकर्तींची नावे आहेत. त्यामध्ये हिरा बनसोडे, ऊर्मिला पवार, हिरा पवार, राही भिडे, माया पंडित, उल्का महाजन, नीरजा, प्रतिमा जोशी, सिसिलिया कार्व्हालो, निरा अडारकर, कुंदा. प्र.नि., उमा चक्रवर्ती, कामाक्षी भाटे, शिल्पा कांबळे, किरण मोघे, ज्योती म्हापसेकर, सुरेखा दळवी, आशालता कांबळे, संध्या गोखले आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा >>>महाविकास आघाडीचे दहा दिवसांत जागावाटप; शरद पवार यांचे प्रतिपादन

न पटणाऱ्या भूमिकांना संवैधानिक मार्गाने वैचारिक विरोध करणे गैर नाही. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणवून घेणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून याची पायमल्ली होत असेल आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शांत राहून बघत असतील, तर हे अतिशय खेदजनक आहे. स्त्रीचा सन्मान अशा पद्धतीने पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होत असल्याने आम्ही संविधानप्रेमी स्त्रिया सामूहिकरीत्या या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.

विचारवंत रावसाहेब कसबे, कवी यशवंत मनोहर, अॅड. असीम सरोदे तसेच प्रणिती शिंदे, शिवाजी काळगे आणि बळवंत वानखेडे या राखीव मतदारसंघातील काँग्रेस खासदारांच्या घरासमोर वंचितच्या ‘सम्यक विद्यार्थी संघटने’ने मागच्या आठवड्यात आंदोलन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी केलेल्या वक्तव्याला ‘उत्तर द्या’ अशी आंदोलकांची मागणी आहे.

हेही वाचा >>>विधानसभेचे पूर्वरंग: मुंबई कोणाची? महायुती की महाविकास आघाडीची

‘वंचित’चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली मायदेव आणि ‘वंचित’चे कार्यकारिणी सदस्य महेश भारतीय हे सम्यक आंदोलन संघटनेचे सल्लागार व सदस्य आहेत. या प्रकरणी वंचितकडून बोलायला कोणी तयार नाही.

स्त्रिया जेव्हा जेव्हा प्रखर प्रतिरोध करू पाहतात तेव्हा तेव्हा त्यांच्या कथित चारित्र्यावर अश्लाघ्य पद्धतीने बोलले- लिहिले जाते. स्त्रियांना नामोहरम करण्याचा हा जुना मनुवादी कावा आहे.-प्रज्ञा दया पवार, कवयित्री