माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा या दोघांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये मोठी खळबळ माजली आहे. त्यातच आरोपी प्रज्वल रेवण्णा यांनी देशाबाहेर पलायन केल्याचे समोर आले आहे. या आरोपांनंतर जनता दल सेक्युलरने (जेडीएस) प्रज्वल रेवण्णा यांचे पक्षातून निलंबन केले आहे. हे कर्नाटकातील आजवरचे सर्वांत मोठे सेक्स स्कँडल असल्याचे म्हटले जात आहे.
प्रज्वल रेवण्णाची राजकीय पार्श्वभूमी
२०१८ मध्ये विधानसभेच्या हंसूर मतदारसंघातून उभे राहण्यासाठी पक्षाने प्रज्वल यांना तिकीट दिले नव्हते, तेव्हा त्यांनी हा निर्णय मान्य केला. मात्र, आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत ते म्हणाले होते की, “पक्ष ‘सुटकेस कल्चर’ला प्रोत्साहन देतो आहे.”
प्रज्वल रेवण्णा यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे एक हजारांहून अधिक व्हिडीओ असल्याची माहिती आहे. जेडीएस सध्या आपल्या पक्षाची झालेली नाचक्की झाकोळून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. विशेष म्हणजे हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणि त्यांच्यावर आरोप होण्यापूर्वीच प्रज्वल जर्मनीला पळून गेले आहेत.
३३ वर्षीय प्रज्वल यांचा स्वभाव बंडखोर आहे असे म्हटले जाते. तसेच ते स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षाही दिसून येते. त्यांची आई भवानी रेवण्णा या कृष्णराजनगरमधील राजकीय कुटुंबातील आहेत. राजकीय कारकिर्दीसाठी प्रज्वल रेवण्णा यांना त्यांच्या आईकडूनच मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : काँग्रेसकडून बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांनाही उमेदवारी, कारण काय?
वयाच्या २४ व्या वर्षी राजकारणात
प्रज्वल हे इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत. ते माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे ज्येष्ठ सुपुत्र एच. डी. रेवण्णा यांचे सुपुत्र आहेत. प्रज्वल रेवण्णा यांनी ऑस्ट्रेलियामधून एम. टेक केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगदी काही काळापूर्वी भारतात आलेल्या प्रज्वल यांनी थेट राजकारणात उडी घेतली होती. त्यावेळी त्यांचे वय फक्त २४ वर्षे होते. आपल्या आजोबांच्या आजूबाजूला सतत वावरणारे प्रज्वल रेवण्णा बघता बघता लोकांसाठी परवलीचा राजकीय चेहरा झाले आणि ते लोकांमध्ये सहजपणे मिसळूनही गेले.
कुटुंबातच राजकीय वैमनस्य
मात्र, एच. डी. देवगौडा यांच्या कुटुंबातच त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये एक प्रकराची राजकीय स्पर्धा आहे. एच. डी. रेवण्णा आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आपल्या पक्षावर वर्चस्व ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्या दोघांमधील राजकीय वैमनस्य दिवसेंदिवस वाढतच गेले आहे.
आता या सेक्स स्कँडल प्रकरणातही एच. डी. कुमारस्वामी यांनी फार सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणावरून आपल्याच भावावर आणि पुतण्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “संपूर्ण कुटुंबाला यामध्ये दोषी धरू नका. ते आणि त्यांचे वडील एच. डी. देवेगौडा हे महिलांबाबत नेहमीच आदराने वागत आले आहेत. या संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. करावे तसे भरावे, अशी म्हण आहेच; काय निष्पन्न होते ते पाहू या. जर एखाद्याने चूक केली असेल, तर त्याला माफी देण्याचा विषय येत नाही. आधी या तपासातून काय निष्पन्न होते ते पाहू या, मग मी बोलेन,” असे ते म्हणाले आहेत.
काँग्रेस सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. जोपर्यंत या तपास पथकाचा अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत प्रज्वल यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा कुमारस्वामी यांनी केली आहे. या सगळ्याविषयी बोलताना जेडीएसच्या एका कार्यकर्त्याने म्हटले की, “त्यांच्या कुटुंबातच एकमेकांबाबत असुरक्षिततेची भावना आहे. कुमारस्वामी यांना असे वाटते की, त्यांचा मुलगा निखिल हा देवेगौडा यांचा राजकीय वारस व्हावा; तर रेवण्णा यांच्या पत्नी भवानी यांना असे वाटते की, प्रज्वल यांनी राजकीय वारस व्हावे.”
देवैगोडांसमोर पेच
कृष्णराजनगर मतदारसंघातून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी भवानी यांनी २०१३ पासून अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र, देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी तसे होऊ दिलेले नाही. पण, २०१८ साली प्रज्वल यांना विधानसभेच्या निवडणुकीचे तिकीट नाकारले गेल्यानंतर मात्र कुटुंबातील राजकीय वैमनस्य अधिकच वाढत गेले आणि ते चव्हाट्यावरही आले. त्यानंतर २०१९ मध्ये निखिल कुमारस्वामी यांना मांड्य मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. यामुळे प्रज्वल यांनाही तिकीट दिले गेले पाहिजे, असा दबाव देवेगौडा यांच्यावर कुटुंबातूनच वाढू लागला. सरतेशेवटी कुटुंबातून येत असलेल्या या दबावामुळे देवेगौडा यांनी हसन या त्यांच्या नेहमीच्या मतदारसंघातून प्रज्वल यांना उमेदवारी देऊ केली होती.
तेव्हा हसन मतदारसंघातून जेडीएसचे उमेदवार प्रज्वल असतील, अशी घोषणा केल्यानंतर देवेगौडा यांनी लोकांना भावनिक साद घालत आवाहन केले होते की, त्यांनी आता तरुणांना संधी द्यावी. जेडीएसच्या एका कार्यकर्त्याने याबाबत म्हटले की, “जर देवेगौडा यांनी हे आवाहन केले असेल तर हसन मतदारसंघातील अर्ध्याहून अधिक लोक त्यांचे हे आवाहन नक्की ऐकणार, अशीच परिस्थिती आहे.”
२०१९ मध्ये असेच घडताना दिसून आले. प्रज्वल यांना ५३ टक्के मते मिळाली. या निवडणुकीमध्ये जेडीएस आणि काँग्रेस एकत्र लढत होते. देवेगौडा यांना या मतदारसंघातून आजवर मिळालेल्या मतांहूनही अधिक मते प्रज्वल यांना मिळाली होती. दुसरीकडे, त्या निवडणुकीत माजी पंतप्रधान असलेले देवेगौडा यांचा तुमाकुरु लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. तसेच त्यांचे दुसरे नातू निखिल यांनाही मांड्य मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. रेवण्णा आणि कुमारस्वामी अशा देवेगौडांच्या दोन्ही मुलांमध्ये राजकीय स्पर्धा असल्यामुळे निखिल यांच्या पराभवामागे रेवण्णा यांचाच हात असल्याचे आरोपही झाले होते.
खासदार असूनही मतदार संघात अनुपस्थिती
प्रज्वल यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीबाबत बोलताना एका जेडीएस कार्यकर्त्याने म्हटले की, “प्रज्वल यांनी बरीच निराशा केली आहे. संसदेतही ते फार काही बोलले नाहीत आणि मतदारसंघातही लोकांशी त्यांचा संपर्क नाही. गेल्या पाच वर्षांत प्रज्वल यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. हसन मतदारसंघातील प्रश्नांबाबत संसदेत काय आवाज उठवला, याची काहीही माहिती त्यांनी लोकांसमोर सादर केलेली नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांचे वडील रेवण्णाच या मतदारसंघातील राजकारणामध्ये लक्ष घालत आहेत.”
हेही वाचा : “सूरतमध्ये जे झालं ते फारच वाईट, पण काँग्रेस डबघाईला आल्यास काय करणार?” विजय रुपाणींचा हल्लाबोल
या निवडणुकीमध्ये जेडीएस आणि भाजपाने युती केली आहे. ही युती निश्चित व्हायच्या आधीच देवेगौडा यांनी प्रज्वल हे हसन मतदारसंघातील उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे कुमारस्वामी आणि भाजपा या निर्णयावर नाराज असल्याचे दिसून आले. यावेळी देवेगौडा यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. देवेगौडा वयाच्या ९१ व्या वर्षीही प्रचारात उतरल्याचे दिसून येते आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्वल यांच्या विजयासाठी हसन मतदारसंघात प्रचारसभाही घेतली होती. त्यानंतर बाहेर आलेल्या सेक्स स्कँडलमुळे कर्नाटकातील राजकारण तापले असून भाजपाही अडचणीत आली आहे.
“सध्यातरी प्रज्वल यांच्यासाठी सगळ्याच वाटा बिकट दिसत असल्या तरीही काही सांगता येत नाही. हसन मतदारसंघातील राजकारणामध्ये देवेगौडा कुटुंब कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकते”, असे जेडीएसच्या एका कार्यकर्त्याने म्हटले.