मुंबई : राज्यात सर्वाधिक संख्येने इतर मागासवर्गीय (ओबीसी) असताना त्यांना राजकीय प्रतिनिधित्व अल्प का, असा सवाल करत आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसींचे १०० पेक्षा अधिक आमदार विधानसभेत पाठवा, असे आवाहन ‘वंचित बहुजन आघाडी’चे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून गुरुवारी सकाळी ‘आरक्षण बचाव यात्रे’स प्रारंभ झाला, त्या वेळी ते बोलत होते.
अनुसूचित जात व जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करावी, मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करावे आणि ओबीसी आरक्षण सांविधानिक करावे या मागण्या आंबेडकर यांनी केल्या. मराठा समाजाच्या व्यक्तींना दिलेली ५५ लाख कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. मुंबईतून प्रारंभ झालेल्या यात्रेचा १६ जिल्ह्यांतून प्रवास होणार असून छत्रपती संभाजीनगर येथे ७ जुलै रोजी समारोप होणार आहे.