मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून लादण्यात येणाऱ्या अटी, पक्षाकडून तीन उमेदवारांची झालेली घोषणा यामुळे वंचितबरोबर आघाडी होण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक आहेत.
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबरोबर यावे यासाठी प्रयत्न झाले आहेत. पण प्रकाश आंबेडकर यांची विधाने तसेच पक्षाची एकूणच भूमिका यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आघाडीबाबत साशंकता आहे.
हेही वाचा – रायगडच्या जागेवरून शिवसेना शिंदे गटात वाद ?
वंचितने २७ जागांवर आमची ताकद असल्याचे आधी पत्र दिले. पक्षाला नक्की किती जागा हव्या आहेत हे स्पष्ट केले नाही. याशिवाय १५ ओबीसी व तीन अल्पसंख्याक उमेदवार असावेत, काही उमेदवारांना पाठिंबा द्यावा अशा विविध अटी घातल्या आहेत. जातनिहाय उमेदवार उभे करावेत ही अट मान्य करण्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विरोध आहे. अल्पसंख्याक उमेदवार उभा केल्यास मतांचे ध्रुवीकरण होते. यामुळे धार्मिक आणि जातनिहाय आधारावर उमेदवार उभे करण्यास आघाडीचा विरोध आहे.
वंचितने तीन उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यास तिन्ही घटक पक्षांची तयारी आहे. अकोल्याच्या जागेवर कोणीच दावा सांगितलेला नाही. पण उर्वरित दोनमध्ये वर्धा आणि सांगली या दोन मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा आहे. वर्धा आणि सांगली हे दोन्ही मतदारसंघ वंचितला सोडणे शक्य नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
हमी पत्राला विरोध
लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असे लेखी देण्याची अट वंचित आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घातली. ही अट दोन्ही गटांच्या नेत्यांनी स्पष्टपणे फेटाळली आहे.
हेही वाचा – मध्य प्रदेश भाजपात मोठे फेरबदल, काय आहे भाजपाचा मास्टरप्लॅन?
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि ठाकरे (उभाठा) गट यांच्या महाविकास आघाडीत वंचित आघाडी या चौथ्या मित्रपक्षाला स्थान देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या पक्षाने थेट २७ जागांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या चौथ्या मित्र पक्षाला जास्तीत जास्त दोन जागा देण्याबद्दल चर्चा सुरु आहे. एकटे लढल्यास २७ पैकी ६ जागा निवडून येतील असा दावा वंचितने केला आहे. महाविकास आघाडीत सामील होताना भाजपशी हातमिळवणी करणार नाही हे लिहून द्या या वंचितच्या अटीवर आघाडीतील सर्वच नेते संतप्त झाले आहेत. अशा प्रकारे काहीही लिहून देता येणार नाही, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.