बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्त्व हे माझ्या लेखी ‘अवसरवादी’ होते. मुस्लिम लीगच्या बनातवाला यांच्या बरोबर शिवसेनेची युती करताना १९६६ साली शिवसेना हिंदुत्त्ववादी नव्हती. तेव्हा ‘ उठाव लुंगी, बजाव पुंगी’ अशी घोषणा होती. पण आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधनकारांचा वारसा सांगत शिवसेना पुढे येत असल्याने आता शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची जाहीर न झालेली युती ही धर्मसुधारणेची असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
शिवसेनेला वंचित बरोबरच्या युतीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष यावेत अशी इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्याशी ते बोलत आहेत. त्यांना यश येते का, हे पाहू. पण कॉग्रेसवर भरवसा ठेवू नका, असे उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेकांना फसविले आहे. खरे या दोन्ही पक्षांतील नेत्यांसाठी एक खास शब्द योजिलेला आहे तो म्हणजे ‘निजामी नेते.’ कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील मराठा नेत्यांना गरीब मराठा, ओबीसी नको आहे. वंचित बहुजन आघाडीने केवळ ‘दलितांपुरतेच’ रहावे अशी त्यांची रणनीती होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर राजकीय आघाडी होऊ शकली नाही. आता शिवसेना कॉग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करुन पाहते आहे. त्यांनी तो प्रयोग करुन बघावा. पण आमचे आणि शिवसेनेचे मात्र सारे काही ठरले आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा- “होय, आम्ही स्वातंत्र्यलढ्यात उतरलो होतो; पण काँग्रेसच्या…”, RSS नेते सुनील आंबेकर यांचे मोठे विधान
युतीबाबत अनेक पक्ष आणि नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर कोणाशी युती- आघाडी करणे अधिक सोपे होते असे प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ खरे व्ही. पी. सिंग आणि सीताराम केसरी या दोन नेत्यांशी बोलणे अधिक सोयीचे होते. त्यांच्याबरोबर जुळले. आता शिवसेनेची युती जाहीर झाली तर उद्धव ठाकरे हे या यादीतील तिसरे नाव असेल. ’ कॉंग्रेसकडे आम्ही कधीही जिंकलेल्या जागा मागितल्या नव्हत्या. पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पराभव झालेल्या ११ जागा मागितल्या होत्या. पण त्याही जागा देण्यास कॉग्रेस कधी तयारी झाली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनाही ‘ भरवसा ठेवू नका’ असा सल्ला दिला असल्याचे ते म्हणाले. मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने जागावाटपाबाबतही चर्चा झाली असून कोकणातून आलेला मराठी माणूस शिवसेनेबरोबर राहील, त्यामुळे महापालिका निवडणुकीत यश मिळेल असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.