-दयानंद लिपारे

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – भाजपा यांची सत्ता आल्यानंतर भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची भाजपाशी सलगी वाढू लागली असल्याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातही येत आहे. जिल्ह्यातील प्रकाश आवाडे, विनय कोरे यांनी भाजपाशी जवळीक वाढवायला सुरुवात केली आहे. तर प्रकाश आवाडे हे भाजपाच्या वाटेवर असून त्यांचा प्रवेश ही केवळ औपचारिकता उरली असल्याचे चित्र आहे. या बदलांनंतर चंद्रकांत पाटील, विनय कोरे, धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे यांच्यासह सोबतीला असलेल्या शिंदे गटामुळे भाजपाची जिल्ह्यातली ताकद नक्कीच वाढणार आहे.

सत्तांतरामुळे सांगलीत राष्ट्रवादीच्या भरतीला ब्रेक; प्रवाह पुन्हा भाजपाच्या दिशेने

सन २०१९ सालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीचे संस्थापक प्रकाश आवाडे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे या दोन्ही आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला. कोरे यांचा पूर्वीपासूनच भाजपाला पाठिंबा होता. तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा त्याग करून ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवलेले प्रकाश आवाडे यांनी निकालानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन भाजपाला पाठिंबा दिला. त्यानंतर ते सतत भाजपाच्या भूमिकेचा पुरस्कार करीत राहिले. ते भाजपाच्या बाजूने उभे राहिल्याने त्यांच्या विकास कामांनाही आघाडी सरकारकडून अडथळे आणले गेले. राजकीय किंमत मोजायला लागल्याने आवाडे कमालीचे त्रस्त होते.

राज्यातील सत्तांतराचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम –

दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार विराजमान झाले. त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरही झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून प्रकाश आवाडे यांनी यापुढील सर्व राजकारण भाजपाच्या माध्यमातून करण्याच्या पुनरुच्चार केला आहे. ‘भाजपा भाजपा आणि भाजपा’ असा शब्दप्रयोग ते वारंवार करत आहेत. आगामी सर्व निवडणुका भाजपाच्या माध्यमातून लढवण्यात येतील, असे त्यांनी उघडपणे सांगितले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोष यांच्या इचलकरंजीतील दौऱ्यावेळी त्यांच्या समोरच त्यांनी ही घोषणा करीत आपला संदेश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोहोचेल याची दक्षता घेतली. राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्यानंतर आवाडे समर्थकांनी आदिवासींच्या वेशभूषेत जल्लोषी मिरवणूक काढली होती. त्यामध्ये स्वप्नील आवाडे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे ही त्यांची दोन्ही मुलेही सहभागी झाली होती.

जळगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सध्या तरी भाजपपासून दूर

याखेरीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजनही इचलकरंजी मध्ये करण्यात आले होते. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत चालवल्या जाणाऱ्या हेडगेवार रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून संघ व भाजपा अशी दोहोंशी जवळीक वाढवत असल्याचेही त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपाकडून मंत्रिपद मिळवण्याच्या त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

आवाडे यांची भाजपाची जवळीक अधिकाधिक वाढत चालली आहे –

या सर्व घडामोडी पाहता आवाडे यांची भाजपाची जवळीक अधिकाधिक वाढत चालली आहे. सत्ता बदलामुळे विकास कामांनाही गती येईल असा विश्वास आवाडे बोलून दाखवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रणी असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी वस्रोद्योग मंत्री असलेले प्रकाश आवाडे यांनी केंद्र सरकारच्या वस्त्र धोरणाची भलामण केली. खेरीज, आघाडी सरकारच्या काळात खुंटलेली विकास गती आता नव्या सरकारच्या काळात गतीने मार्गी लागेल, असा आशावादही व्यक्त केला आहे. या सभेत त्यांनी राष्ट्रपतींच्या विजयाचा ठरावही संमत केला. एकूणच आवडे यांच्या प्रत्येक बारीकसारीक हालचाली या ते भाजपाचे सच्चे कार्यकर्ता आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न आहेत. जिल्ह्याच्या राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रात बडे घराणे असलेल्या आवाडे यांची वाटचाल पाहता त्यांनी अधिकृतपणे हाती कमळ घेणे इतकेच काय ते उरले आहे.